पालघर :राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी शिवसेने च्य स्थानिक नेत्याने तुफान बॅनर बाजी केली आहे. जिल्ह्यातील आपल्या पक्षाचे वर्चस्व तसेच युतीमधील घटक पक्षाशी असणाऱ्या स्पर्धेत शिवसेना बॅनरबाजी मध्ये अव्वल ठरली आहे. त्याचबरोबर पक्षामधील बॅनर वादामुळे अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आले आहेत.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे धामणी धरणाच्या ठिकाणी, पालघर एसटी विभागीय कार्यालय व आगर या ठिकाणी भेट देऊन नंतर परिवहन मंडळाला दिलेल्या जागेची पाहणी करणार आहेत. त्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकदरबारचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे.परिवहन मंत्री यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या लहान मोठ्या नेत्यांनी खानीवडे टोल नाका पासून थेट चारोटी, कासापर्यंत मोठ्या प्रमाणात बॅनर लावले असे म्हणून येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येणारा मार्गावर तसेच पालघर शहरात व शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालया च्या परिसरात लहान-मोठे आकाराचे बॅनर मोठ्या संख्येने झळकले आहेत.

या बॅनर मध्ये शिवसेनेचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या छायाचित्रांचा काही बॅनर मध्ये समावेश नसल्याने वादांग निर्माण झाला असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांना देखील बॅनर मध्ये स्थान मिळालेले नाही. त्याचबरोबरिनी शिवसेनेतील काही ज्येष्ठ मंडळी यांची छायाचित्र बोईसर परिसरातील बॅनर मध्ये असताना पालघर मधील काही बॅनर मध्ये त्यांना वगळण्यात आल्याची दिसून आले आहे.

दरम्यान शिवसेनेच्या युवा शाखेच्या जिल्हा संघटक यांनी पालघर शहरातील प्रमुख भागात लावलेले स्वागताचे बॅनर काढून त्या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या मोठ्या आकाराची बॅनर झळकले आहेत. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद पुढे आला असून काल सायंकाळी लावलेले बॅनर कोणी काढले यावर युवा सेनेचे पदाधिकारी शोध घेत आहेत.

नगरपरिषदेचे दुर्लक्ष

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये शासकीय मान्यते शिवाय बॅनर झळकऊ नये असे अभिप्रेत होते. पालघर नगर परिषदेने सुमारे ७५ अनधिकृत बॅनर देखील काढून केलेल्या कारवाईची माहिती उच्च न्यायालयाला कळवली होती. मात्र पालकमंत्री गणेश नाईक यांच्या पालघर दौऱ्याच्या प्रसंगी व आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागता निमित्त शहरात किमान ५०० बॅनर लागले असून त्याकडे नगरपरिषदेने सोयीस्करित्या दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे यापैकी अधिक तर राहणार परिषदेच्या प्रकाश योजनेतील विद्युत खांब व रस्त्यालगत लावण्यात आले असून इतर बॅनर विरुद्ध कारवाई करणाऱ्या नगरपरिषदेने सत्ताधारी मंडळी समोर आपली तलवार म्यान केल्याचे दिसून आले आहे.

पालघर मधील नगरपरिषदेच्या मालकीचे विद्युत काम अथवा इतर शासकीय ठिकाणी विनापरवानगी बॅनर लावले असल्यास त्याचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल.सुप्रिया गुरव, उप मुख्याधिकारी, पालघर