पालघरमधील प्रसूतिगृहाचा प्रश्न गंभीर
निखील मेस्त्री
पालघर : पालघर शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय शेजारी असलेले जे जे युनिटच्या माता व बाल संगोपन केंद्रात प्रसूतींची संख्या लक्षणीय आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून ते बंद असल्यामुळे गरोदर मातांना प्रसूतीसाठी वणवण करावी लागत आहे. हे प्रसूतीगृह केंद्र पुन्हा चालू करावे, अशी मागणी होत आहे.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता करोना काळात या माता बाल संगोपन केंद्राचे रूपांतर करोना उपचार केंद्रांमध्ये केले होते. त्यामुळे सामान्य गरोदर व स्तनदा माता तसेच बालकांना लागण होऊ नये यासाठी दोन महिन्यांपूर्वी हे केंद्र बंद केले गेले. मात्र त्यानंतर गरोदर महिलांना प्रसूतीसाठी अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या. गरोदर महिलांच्या प्रसूतीसाठी पर्यायी व्यवस्था पालघरमध्ये करणे अपेक्षित असताना त्यांना प्रसूतिगृहासाठी मनोर, डहाणू किंवा जव्हार अशा ठिकाणी लांबचा पल्ला गाठावा लागत आहे.
या केंद्रामध्ये महिन्याला दहा ते बारा प्रसूती केल्या जात होत्या. या केंद्रावर पालघर तालुक्याच्या ग्रामीण भागातील कष्टकरी, सर्वसामान्य व आर्थिकदृष्टय़ा बेताची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील गरोदर माता प्रसूतीसाठी येत असतात. मात्र त्यांना प्रसूतीसाठी इतरत्र जावे लागत असल्याने त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
गरोदर महिलांना मनोर येथे पाठविल्यानंतर तेथे करणे देऊन डहाणू किंवा जव्हार रुग्णालयात पाठविण्यात येते. त्यामुळे त्यांची हेळसांड होत आहे. गरोदर मातांना लसीकरणासाठी व तपासणी साठी पर्यायी व्यवस्था केली असली तरी प्रसूतीसाठी मात्र त्यांची वणवणच होत आहे. काही कुटुंबांनी प्रसूतीसाठी लांब पल्ला गाठण्याऐवजी उसनवारी करून पालघरच्या खाजगी रुग्णालयांमध्ये प्रसूती केल्याच्या घटना ताज्या आहेत. जवळ शासकीय प्रसूती केंद्र नसल्याने वेळ प्रसंग उदभवल्यास खाजगी रुग्णालयांशिवाय पर्याय नसल्याने या गोरगरीब कुटुंबीयांची आर्थिक पिळवणूक व हेळसांड होण्याची शक्यता आहे. प्रसूतीसाठी लांब पल्लय़ाचा प्रवास करताना एखादा पेच प्रसंग उदभवला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासाठी पालघर परिसरातील गरोदर मातांसाठी पर्यायी शासकीय प्रसूती केंद्र उपलब्ध करून द्यावे अशी मागणी समोर येत आहे.
दरम्यान, दोन ते तीन महिन्यांपूर्वी एका करोनाग्रस्त गरीब गरोदर महिलेला पालघर येथे प्रसूती केंद्र नसल्याने तिला मनोर येथे पाठविण्यात आले होते. रस्त्यातच तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. प्रसंगावधान राखत डॉक्टरने रुग्णवाहिकेतच या महिलेची प्रसूती केली होती. यादरम्यान माता महिला व बाळ सुखरूप होते. मात्र अशीच घटना दुसऱ्या मातांसोबतही घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
करोना उपचार केंद्र असल्यामुळे सध्या तरी प्रसूतिगृह सुरू करणे शक्य नाही. मातांच्या प्रसूतीसाठी डहाणू, मनोर, जव्हार रुग्णालय आदी ठिकाणी व्यवस्था केलेली आहे.
-डॉ.राजेंद्र केळकर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक