डहाणू : डहाणू तालुक्यातील डहाणूची महालक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महालक्ष्मी देवीचा जत्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चैत्र पौर्णिमा (१२ एप्रिल) हनुमान जयंतीच्या दिवशी जत्रोत्सव सुरू होऊन पुढे १५ दिवस यात्रा सुरू राहणार आहे. यात्रेची तयारी सुरू झाली असून जत्रा सुरळीत पार पाडण्यासाठी मंदिर विश्वस्त, ग्रामपंचायत, तालुका प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दुसरीकडे जत्रेत आपल्या दुकानाची जागा मिळवण्यासाठी गुढीपाडव्या पासून दुकानदारांनी विवळवेढे गावात गर्दी केली आहे.
पालघर मधील सर्वात मोठी जत्रा म्हणून महालक्ष्मी जत्रेचा नावलौकिक आहे. महाराष्ट्र, गुजरातच्या सीमेलगत आणि आदिवासी बहुल भाग असल्यामुळे यात्रेत महाराष्ट्र सह गुजरात राज्यातून बहुसंख्य लोक दर्शनासाठी येत असतात. जत्रेनिमित्त करमणुकीसाठी उभारल्या जाणाऱ्या पाळणा व्यावसायिकांनी पाळणे उभारण्यास सुरुवात केली असून सध्या ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.
जत्रेला अवघे काही दिवस राहील्यामुळे जत्राकरूंची धावपळ सुरू झाली आहे. दुकानासाठी जागा मिळवण्यासाठी दुकानदारांची रेलचेल वाढली असून चांगली जागा मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. जुने दुकानदार गावात दाखल झाले असून त्यांनी दुकाने उभारण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक दुकानदार आपली दुकाने सजवण्यात दंग झाले असून जत्रेसाठी दुकानात विक्रीसाठी नवनवीन साहित्य भरण्याची लगबग सुर आहे. ग्रामपंचायत कडून दुकानदारांना रस्त्यांपासून ठराविक अंतरावर आखणी करून देण्यात आली असून त्यानुसार दुकानदारांनी आपली दुकाने मागे सरकवून घेतली आहेत.
महालक्ष्मी जत्रा
विवळवेढे येथील महालक्ष्मी जत्रेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार महालक्ष्मी देवीची जत्रा ही पूर्वी जव्हार येथील महालक्ष्मी मंदिरात भरवण्यात येत होती. अनेक वर्षांपूर्वी राज्यात प्लेग ची साथ आल्यामुळे जत्रा भरवणे शक्य नसल्यामुळे जव्हार येथील राजघराण्याने विवळवेढे येथील मंदिरात जत्रा भरवण्याचे नियोजन केले. त्याकाळी सुरू झालेल्या या जत्रेला परिसरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून यांनतर महालक्ष्मीची जत्रा विवळवेढे येथे सुरू राहिली. जत्रेत महालक्ष्मी गडावर चढवला जाणार ध्वज हा आजपर्यंत जव्हार येथून पाठवण्यात येत असून जव्हार च्या राजघराण्यातील वारस जत्रेत झेंडा घेऊन येत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली.
मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व
डहाणू च्या महालक्ष्मी मंदिराचा इतिहासात देखील उल्लेख आढळतो. अकबराच्या काळात राजा तोरडमल याने देवीचे दर्शन घेतल्याची इतिहासात नोंद आहे. तसेच पंजाब प्रांताचा राजा रणजित सिंह याने पंजाब सर केल्यानंतर देवीची महापूजा करून मंदिरावर सोन्याचा कळस चढवला अशी नोंद देखील आढळते. डहाणूची महालक्ष्मी देवी ही “कोल्हापूर” तर काहींच्या मते “कोळवण” ची महालक्ष्मी असल्याचे बोलले जाते. आईचे मूळ स्थान हे विवळेवेढे गावच्या पश्चिमेकडे असलेल्या मुसळ्या डोंगरावर आहे. तिथे देखील आता भव्य मंदिर बांधण्यात आले असून, लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तेथून भक्ताच्या आर्जवामुळे देवी डोंगराच्या खाली येऊन विवळवेढे गावात वसल्याची अख्यायिका जुन्या जाणत्यांकडून सांगितली जाते. महालक्ष्मी देवीचे पूर्वीचे मंदिर हे लाकडाचे होते. मात्र, लाकडे कुजून मंदिराची दुरवस्था झाल्यामुळे मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले. आता मंदिराला ५८ मजबूत खांब असून भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात मंदिराचा नावलौकिक वाढला असून सध्या दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी दाखल होत आहेत.
आदिवासी, कुणबी, कोळी सह पालघर मधील बहुसंख्य कुटुंबांची कुलदैवत
विवळवेढे गावची महालक्षमी देवी ही येथील आदिवासी, कुणबी, कोळी सह पालघर आणि गुजरात मधील बहुसंख्य कुटुंबांची कुलदैवत म्हणून ओळखली जाते. देवीची पूजा, अर्चा आणि सेवेचा मान हा विवळवेढे येथील सातवी कुटुंबीयांचा आहे. सातवी कुटुंबाला महालक्ष्मी देवी प्रसन्न असून सातवी कुटुंबीय पूर्वापारपासून देवीची पूजा अर्चा करून सेवा करतात. विवळवेढे गावासह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये शुभकार्याची सुरुवात करण्याआधी कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी देवीला साकडे घालूनच कार्याला सुरुवात केली जाते. महाराष्ट्र राज्यासह गुजरात राज्यातील लाखो भाविक दरवर्षी महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येत असतात.
जत्रेतील आगोटीची खरेदी
महालक्ष्मी जत्रेमध्ये आगोटीच्या खरेदीला स्थानिक पातळीवर खूप महत्त्व आहे. कांदा, लसूण, मसाले आणि सुकी मासळी घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळते. जत्रेत पूर्वापार पासून चालत आलेली देवाण घेवनीची पद्धत अजूनही त्याच पद्धतीने जपली जात असल्यामुळे आदिवासी बांधवांना जंगलातील वनस्पतींच्या बदल्यात आगोटीची खरेदी करता येते या पद्धतीला “भारोभार” पद्धत म्हणतात. जंगलात मिळणाऱ्या काजू, कुंजा, रिठा, बुऱ्हाडा, कागोले, डिंक इत्यादी वनस्पतींच्या बदल्यात कांदे, लसूण, बटाटे, तेल आणि मसाल्यांची खरेदी करता येते. जंगलातील पदार्थांच्या वजनाच्या बदल्यात त्यांच्या योग्यतेप्रमाणे भाव ठरवून त्यांचा बदल्यात कांदा-लसूण किव्वा इतर जिन्नस दिले जात आहेत. जिल्ह्यासह नाशिक, मालेगाव, संगमनेर तालुक्यांतून मोठमोठे कांदा व्यापारी जत्रेत दुकाने घेऊन येतात. या पूर्वी झालेल्या यात्रेतील फोटो