आयएसओ मानांकन मिळवणारे राज्यातील एकमेव पोलीस ठाणे

पालघर : मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाले आहे. राज्यातील एकमेव पोलीस ठाणे असल्याचे म्हटले जात आहे. बुधवारी हा प्रमाणपत्र प्रदान सोहळा पालघर पूर्वेकडील सेंट जॉन कॉलेज सभागृहात बुधवारी पार पडला.

गेल्या अनेक वर्षांचा पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचा कामगिरीचा आलेख हा आता सुधारला आहे. गुन्ह्यांची उकल करण्याबरोबर कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक, रेल्वे प्रवाशांना सेवाभावी वृत्तीने सेवा देणे, जप्त मुद्देमाल रेल्वे प्रवाशांना परत करणे अशी चांगली कामगिरी पोलिसांकडून घडत आहे. गुणवत्ता व्यवस्थापन व प्रणाली यासाठी आएसओ हे आंतरराष्ट्रीय मानांकन दिले जाते.    या मानांकनासाठी लागणाऱ्या सर्व अटी-शर्तीची पूर्तता अवघ्या तीन महिन्यांत लोहमार्ग पोलिसांनी केली होती. आयएसओ मानांकन मिळाल्याचा सार्थ अभिमान असल्याचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश देवरे यांनी यानिमित्ताने म्हटले आहे.

कागदपत्रांची सुसूत्रता व कार्याचे तत्परतेने पालन, कामामध्ये सुधारणा तसेच समन्वय अशा बाबींचे पुरेपूर पालन केल्यामुळे हे मानांकन प्राप्त झाल्याचेही देवरे यांनी म्हटले आहे. पोलीस ठाण्याच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे महाराष्ट्रामधील एकमेव आयएसओ मानांकित पोलीस ठाणे म्हणून लोहमार्ग पोलीस ठाण्याला मान मिळाला आहे, असे देवरे यांनी अभिमानाने म्हटले आहे.  दरम्यान, प्रमाणपत्र प्रदान सोहळयाला पोलीस उपआयुक्त यांच्यासह रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व पालघर पोलीस ठाणे अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, आयएसओ मानांकन संस्थेचे डॉ. प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

गृहरक्षक दलाला सेवेत आणण्यासाठी प्रयत्न

रेल्वे स्थानकांवर पोलिसांबरोबर गृहरक्षक दलाची महत्त्वाची भूमिका असते. मात्र अशा परिस्थितीत गृहरक्षक दल जवानांना रेल्वे स्थानकांची सेवा खंडित केल्याच्या प्रश्नावर आयुक्त खालिद यांनी उत्तर देताना रेल्वे स्थानकांवर वाढती गर्दी लक्षात घेता गृहरक्षक दल यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. राज्य शासन त्या दृष्टीने प्रयत्न करत असून लवकरच त्यांना रेल्वे पोलीस महामार्गाच्या कर्तव्यावर सामावून घेतले जाईल, असे सांगितले.

‘सर्व पोलीस ठाणी अद्ययावत करणार’

पालघरसारखी भविष्यात सर्व पोलीस ठाणी मला अद्ययावत करायची असून पोलीस आयुक्तालयाचे नाव सर्वत्र उंचवायचे आहे, असे प्रतिपादन लोहमार्ग आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी कार्यक्रमाच्या वेळी केले. आपण जी शपथ घेतली ती शपथ शेवटपर्यंत पाळा, कायद्याचे रक्षण करताना नावलौकिक निर्माण होईल असे कार्य करा व स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करा, असे आवाहन त्यांनी पोलिसांना केले.