पालघर : पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय महत्त्वाचे अनेक प्रकल्प सुरू असून प्रकल्पाच्या नियोजनाचे टप्पे अभ्यास करून पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांवर आपण लक्ष देणार असून शिक्षण व आरोग्य या विभागाकडे प्राधान्याने लक्ष देऊ असे पालघरच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखर यांनी प्रतिपादन केले.

पालघर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रशासकीय कामकाजातील आपल्या अनुभवाची माहिती देऊन प्रथमदर्शनी जिल्ह्यात प्राधान्याने करावयाच्या कामांबाबत माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे उपस्थित होते.

जिल्ह्यात सुरू असणाऱ्या व सुरू होऊ  पाहणाऱ्या प्रकल्पाच्या दृष्टीने पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांकडे आपण आगामी काळात लक्ष देणार असून या आठवडा अखेरीस पुण्यात होणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्या परिषदेत शासन स्तरावरून नेमून देण्यात येणाऱ्या प्राधान्य कामांच्या दृष्टीने लक्ष देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन विकास निधी अंतर्गत होणाऱ्या कामांवर झालेल्या खर्चाचा आढावा घेणार असल्याचे सांगत त्यानंतर तालुका स्तरावर असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र बैठका घेऊ असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात आरोग्याची समस्या महत्त्वपूर्ण असून मनुष्यबळाची मर्यादा असल्याने उपलब्ध कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करून त्याला रुग्णांचे चांगल्या पद्धतीने निदान करण्यासाठी तयार करण्यावर आपला भर राहील असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर लवकरात लवकर सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी सूचना पत्रकारांनी केली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आपला यापूर्वी देखील प्रयत्न राहिला असून हे काम पालघर मध्ये सुरू राहील असे त्या पुढे म्हणाल्या.

जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेत बाधित झालेल्या नागरिकांना त्यांचा जागेचा मोबदला देणे, चुकीच्या पद्धतीने मोबदला दिल्या गेलेल्या कडून शासकीय निधीची पुनर्प्राप्ती करणे इत्यादी बाबींकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण दरम्यान पालकमंत्री महोदयांनी निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटी, पालघर घोटी सिन्नर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण व मजबुतीकरण संदर्भातील प्रश्न, सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद ग्राम विकास विभाग पर्यटन इत्यादी विभागांकडून एकाच कामाची दुबार देयक काढण्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आपण गंभीर असून दुबार देयके अदा करण्यात येऊ नये यासाठी व्यवस्था उभारू असेही त्यांनी पत्रकारांना आश्वासित केले. जिल्ह्यात व विशेषता पालघर व वाडा प्रदूषणाची गंभीर समस्या असून त्यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या स्थानीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली जाईल असे डॉ. जाखर म्हणाल्या.