डहाणू : डहाणूच्या मसोली येथील वीज महावितरणच्या कार्यालयाच्या परिसरात ई-कचरा साचला आहे. खराब झालेले, दोषयुक्त अथवा जप्त केलेले वीजमीटर, केबल, लोखंडी वायर तसेच नादुरुस्त उपकरणांचा कचरा विभागीय कार्यालयात जमा होतो आहे. पण हा कचरा उचलण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीत अडकल्याने हा कचरा इथेच साचून राहिला आहे.
डहाणू तालुक्यातील वीज महावितरणचे ४५ हजार घरगुती ग्राहक आहेत. या सगळय़ाच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये वीज वाहिन्या, नादुरुस्त मीटर, ट्रान्सफॉर्मर, केबल्स, विजेचे खांब तसेच इतरही ई-कचरा मोठय़ा प्रमाणात महावितरणकडे जमा होतो. पूर्वी मोठय़ा आकाराचे जुने मीटर आणि मॉनिटर असायचे. आता त्यांची जागा प्लास्टिकचे झाकण असलेल्या फ्लॅट डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीटर्सनी घेतली आहे. हा ई कचरा ऑनलाइन पद्धतीने ई-कचरा ई-टेंडरद्वारे उचलण्याची, त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया ठेका पद्धतीत अडकल्याने डहाणूसह सर्व विभागीय महावितरण कार्यालये ई-कचऱ्याच्या विळख्यात सापडली आहेत.
घरगुती उपकरणे आणि शेकडो नादुरुस्त व बिघाड झालेले मोबाइल्स, टेलिव्हिजन संच आणि कॉम्प्युटर्स तसेच वापरास अयोग्य असलेल्या ई-कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे. इलेक्ट्रॉनिक वेस्ट (मॅनेजमेंट अॅ न्ड हँडिलग) कायद्याअंतर्गत साध्या कचऱ्याप्रमाणे तुम्ही ई-कचरा कुठेही टाकू शकत नाही. टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप किंवा अन्य कोणताही ई-कचरा घराबाहेर सार्वजनिक जागेवर टाकल्यास तो कायद्याचा भंग ठरतो. तर सार्वजनिक ठिकाणी घरगुती ई-कचरा टाकल्यास प्रदूषण नियंत्रण महामंडळ त्याविरुद्ध कारवाई करू शकते. वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ई-कचऱ्याचे व्यवस्थापन करून तो नष्ट करण्यासाठी काही नियम बनवले आहेत. पर्यावरण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार नागरिक त्यांचे जुने इलेक्ट्रॉनिक साहित्य अधिकृत संग्रह केंद्रावर, रिसायकिलग करणाऱ्या अधिकृत संस्थेकडे किंवा त्या साहित्याची निर्मिती करणाऱ्या उत्पादकाकडे जमा करून त्या साहित्याची विल्हेवाट लावू शकतो.
धोकादायक भंगार
डहाणू शहरात सार्वजनिक ठिकाणी भंगार दुकानात ई-कचऱ्याची साठवणूक केली जाते. डहाणूत निर्माण होणारा शेकडो ई-कचरा भंगार व्यापारीच खरेदी करतात. हा ई-कचरा पर्यावरणाला धोकादायक असल्याने आणि सरकारी मान्यता नसल्याने त्याची खरेदीविक्री वाहतूक सगळेच चोरमार्गाने होते. पण या कचऱ्यातून पैसा अधिक मिळत असल्याने शहरात कचरा व्यवसायिक वाढले आहेत.
पूर्वी वीज कंपनीच्या विभागीय कार्यालयात जमा झालेला ई-कचरा आणि नादुरुस्त साहित्य, उपकरणे पालघर कार्यालयात जमा केले जात होते. मात्र ई टेंडर प्रक्रियेमुळे ठेका पद्धतीने ठेकेदार कंपनीकडून ई कचरा उचलला जातो. सध्या ही ई-कचऱ्याच्या टेंडरच्या प्रक्रियेचेच काम चालू आहे. टेंडरच्या बाबी पूर्ण होताच तो कचरा उचलला जाईल.-बी. एस. धोडी, उपअभियंता, डहाणू विभागीय कार्यालय महावितरण

Story img Loader