पालघर : घोलवड, डहाणू येथील चिकूला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असले तरी या फळाला बाजार भाव मिळण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या उद्योग संचालनालयाच्या समूह विकास योजनेअंतर्गत तलासरी तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने घोलवड बोर्डी चिकू फाऊंडेशनच्या वतीने चिकू प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. हे केंद्र येथील बागायतदारांसाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पाचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे.
चिकू फळावर प्रक्रिया करण्यास मर्यादा होत्या. या अनुषंगाने बोर्डी, घोलवड परिसरातील घोलवड बोर्डी चिकू फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रणिल सावे, अमोल पाटील, संगीता सावे, प्रतीश राऊत, सिद्धार्थ पाटील, अनिकेत राऊत यांच्यासह ४० लघु उद्योजक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन राज्य सरकारच्या औद्योगिक समूह विकास योजनेत सहभागी होऊन सुमारे साडेसात कोटी रुपयांचा चिकू प्रक्रिया प्रकल्प उभा केला आहे.
हेही वाचा – पालघर लोकसभा मतदारसंघावर भाजपा दावा कायम
तलासरी तालुक्यात आणि बोर्डी जवळ असलेल्या ब्राह्मणगाव येथे हे केंद्र उभारण्यात आले आहे. चिकू शास्त्रीय पद्धतीने पिकवण्यासाठी इथिलीन वायूच्या मदतीने दररोज सुमारे पाच टन चिकू फळ टिकवण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या पिकलेल्या चिकूप्रमाणे गोडवा या नियंत्रित वातावरणात कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळात अबाधित राहील, असा विश्वास आहे.
या प्रक्रिया केंद्रात एक टन चिकू फळाच्या चकत्या दररोज विद्युत प्रणालीच्या आधारे सुकवण्यासाठी तीन विद्युत ड्रायर आहेत. यामुळे सूर्यप्रकाशावर अवलंबून न राहता वर्षभर चिकू सुकवण्याची प्रक्रिया सुरू राहील अशी आशा आहे. त्याचबरोबर सुकविलेल्या चिकूचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी व निर्यातीसाठी उपयुक्त ठरणारे ‘फ्रिज ड्रॉईंग’ पद्धतीचे यंत्र उभारण्यात आले असून त्यामधून दररोज ५०० किलो चिकू फळावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.
हेही वाचा – पालघर: २८ कोटीचा गैरव्यवहार नऊ महिने कारवाईच्या प्रतीक्षेत
या सामूहिक प्रक्रिया सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी साडेसात कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. याकरिता ४० उद्योजकांनी त्यापैकी अडीच कोटी रुपयांची भाग भांडवल उभारणी केली आहे. ही संस्था कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत करण्यात आली असून समभाग धारकांच्या व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांनादेखील उपलब्धतेनुसार प्रक्रिया करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.
उत्पादन देशभर पोहोचण्यास मदत
भौगोलिक मानांकन मिळालेल्या चिकू फळाला किमान वेळेत शहरी भागापर्यंत पोहोचवणे हे आव्हान असते. त्यामुळे या नाशिवंत फळाची अनेकदा पाच ते १५ रुपये प्रति किलोने विक्री होत असते. बहराच्या वेळी डहाणू तालुक्यात ३०० ते ४०० टन तर इतर वेळी ५० ते ६० टन दर दिवशी चिकू उत्पादन होत असून त्यापैकी सात ते १५ टक्के फळाचे नुकसान होत असताना दिसते. परंतु आता या फळावर प्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने त्याचे मूल्यवर्धन होण्यास मदत होणार आहे. या प्रक्रिया केंद्रामुळे डहाणू तालुक्यातील पर्यटनालादेखील चालना मिळेल, अशी अपेक्षा असून आता चिकूचे उत्पादन देशभर पोहोचण्यासाठी या सुविधा केंद्राच्या माध्यमातून येथील बागायतदारांना संधी उपलब्ध झाली आहे.