पालघर : डहाणू शहराचा विकास आराखडा अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असताना डहाणूचा शाश्वत विकास साधण्यासाठी पर्यटनाला चालना देणे महत्त्वपूर्ण ठरेल, असे निरीक्षण अभ्यासात नोंदवण्यात आले आहे.
‘पर्यटन दृष्टिकोनातून डहाणूचा विकास’ या विषयावर फरझान बेहेरामशाह माझदा या तरुणाने पुणे येथील सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून विद्यावाचस्पती पदवीसाठी केलेल्या अभ्यासाला ऑक्टोबर २०२२ मध्ये मान्यता देण्यात आली आहे. डहाणू शहरात येणारे पर्यटक, पर्यटन व्यावसायिक, नागरिक जागामालक, हॉटेलमालक, संबंधित विभागातील शासकीय अधिकारी व राजकीय क्षेत्रातील मंडळींशी यांच्याशी चर्चा करून त्यांनी आपला अभ्यास अहवाल रूपात विद्यापीठाला सादर केला होता. या अभ्यासात बहुतांश मंडळींनी डहाणू परिसरात पर्यावरण व नैसर्गिक सौंदर्य राखून विकास साधण्याचा विचार मांडला. या दृष्टीने सध्याचे शासकीय व पर्यावरणीय निर्बंध पाहता या दृष्टिकोनातून पर्यटन विकासासाठी चालना मिळावी, असा विचार त्यांनी आपल्या प्रबंधातून मांडला आहे.
फळभाग परिमंडलन (झोनिंग) मध्ये कृषी पर्यटन व पर्यटन उद्योग उभारण्यास मर्यादा व अडचणी येत असल्याचे पाहून फळबाग क्षेत्राला कृषी परिमंडलनमध्ये वर्गीकरण करावे, असे सुचविले आहे. त्याचप्रमाणे आदरातिथ्य क्षेत्र विकसित करून विविध शासकीय विभागांशी समन्वयासाठी व्यवस्था उभी करणे, पर्यटन संदर्भातील परवानग्यांसाठी एक खिडकी योजना अमलात आणवी, असे सुचविले आहे.
डहाणूच्या विकास आराखडय़ाला मान्यता देऊन सागरी नियमन क्षेत्र (कोस्टल रेग्युलेटरी झोन) मध्ये असणाऱ्या निर्बंधाला शिथिलता देणे, चटई क्षेत्र निर्देशांक वाढवणे, असे सुचविले आहे. या भागातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी योजना राबवणे, शहरात येणाऱ्या पर्यटकांकडून उपकर आकारणे, स्थानिक वारसा संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देणे, विविध महोत्सवांचे आयोजन करणे, नवीन बांधकाम विशिष्ट विषयांवर आधारित करण्यासाठी आचारसंहिता लागू करणे, असे सुचवले आहे. याखेरीज डहाणू येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नियोजन करणे व आवश्यकतेनुसार बाह्यवळण (बायपास) मार्गाची उभारणी करण्याबाबतही या अभ्यासात नमूद केले आहे.
पर्यटनाला पोषक तालुका
डहाणू तालुक्यात अधिकांश भागात हिरवळ असल्याने पर्यटनासाठी येथील वातावरण पोषक ठरत आहे. या तालुक्याला चिंचणी, धाकटी डहाणू, डहाणू, नरपड, चिखला टोकेपाडा, बोर्डी अशी समुद्रकिनारी पर्यटकांना खुणावणारी गावे असून श्री महालक्ष्मी देवी, श्री संतोषी माता मंदिर अशी मंदिर आहेत.
‘निसर्गाचा समतोल राखणे गरजेचे’
एकीकडे मागील ३०-३५ वर्षांपासून विकास आराखडा मंजूर न झाल्याने डहाणू शहराचा विकास खुंटला असताना डहाणू शहरात शहरातील निसर्गाचा समतोल राखून आर्थिक उन्नतीसाठी पर्यटन विकास करणे हे येथील नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायी ठरेल, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.