कीर्तिसुधा राजपूत
मुलांच्या व्यक्तिगत विकासामध्ये त्यांच्या सामाजिक वैशिष्टय़ांची, सामाजीकरणाची फार महत्त्वाची भूमिका आहे. मुलांचा सामाजिक विकास हा वयाच्या अगदी पहिल्या महिन्यापासून निदर्शनास येऊ शकतो.
व्यक्तीच्या सामाजिक विकासाचा सर्वात पहिला टप्पा म्हणजे आपल्या अवतीभवतीच्या व्यक्तींचे आवाज वा स्पर्श ओळखणे आणि त्यास प्रतिदास देणे. मान वळवून किंवा नजरेने अर्थपूर्ण संपर्क करून मूल ओळखीच्या आवाजाला व स्पर्शाला हा प्रतिसाद देते. जर पालक जन्मापासूनच मुलाशी मायेने बोलत असतील, त्यांच्यासोबत गुणवत्तापूर्ण वेळ व्यतीत करत असतील तर साधारण वयाच्या तीन महिन्यापासून मूल परस्पर हास्य करायला लागते.
नजरेने अर्थपूर्ण संपर्क करणे अर्थात आय कॉन्टॅक्ट देणे आणि परस्पर हास्य करणे (सोशल स्माइल) हे व्यक्तीच्या सामाजिक संबंध प्रस्थापित करण्याची पहिली पायरी आहे.
वयाच्या साधारण आठ महिन्यापासून मूल परिचित व प्रियजनांपासून दूर जाण्यासाठी घाबरते. अपरिचित व्यक्ती जवळ आल्यास हे मूल स्वत:ला लपवण्याचा प्रयत्न करते. अपरिचित व्यक्तीने उचलून घेतल्यास व परिचित व्यक्ती दूर झाल्यास मूल अस्वस्थ होते, रडू लागते. याला सेपरेशन एंक्सायटी म्हणतात. हा मुलांच्या सामाजिक विकासाचाच एक टप्पा आहे. परिचित-अपरिचित व्यक्तींमध्ये भेद करण्याची मुलांची वाढती क्षमता यातून निदर्शनास येते. अवतीभवतीच्या जगाचा आढावा घेताना, नवनवीन जाणून घेण्यासाठी साहस करू पाहतांनाच दुसरीकडे मूल एक सुरक्षित, मजबूत आधार पाठीशी आहे याची खात्री करत असते. त्यात समतोल राखण्याचा हा प्रयत्न करत असतो.
जेव्हा जेव्हा मूल अस्वस्थ, भयावह होईल वा गोंधळून जाईल, तेव्हा तेव्हा त्याला कुटुंबातून प्रेमळ, सुरक्षित वा आश्वासक प्रतिसाद मिळाल्यास मुलांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना वृिद्धगत व्हायला मदत होते. ही विश्वासाह्र्यता केवळ स्वत:पुरती किंवा कुटुंबीयांपुरतीच मर्यादित न राहता आयुष्यात पुढे सर्व सामाजिक हितसंबंधांमध्ये ती जोपासली जाते. अर्थात त्याची पाळंमुळं मुलांच्या बालवयातील अनुभवांवर आधारित आहेत. कौटुंबिक कलह, उपेक्षा, बेजबाबदार पालकत्व, निष्काळजीपणा, कौटुंबिक हिंसा यातून मुलांमध्ये अविश्वसनियेतीची भावना वाढीस लागते. अशा परिस्थिती वेळीच आवश्यक मानसिक आधार वा उपचार न मिळाल्यास त्यांना जीवनात वैयक्तिक संबंध व सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
मुलांमध्ये स्वत:विषयी आणि भोवतालच्या व्यक्ती व परिस्थितीविषयी विश्वासू वृत्ती विकसित करण्यामध्ये सुजाण पालकांची आणि निकोप कौटुंबिक वातावरणाची महत्त्वाची भूमिका आहे. मुलांच्या मनो-सामाजिक विकासाकरिता ते आवश्यक आहे. (लेखिक पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ आहेत.)
बालक पालक: मनोसामाजिक विकास
मुलांच्या व्यक्तिगत विकासामध्ये त्यांच्या सामाजिक वैशिष्टय़ांची, सामाजीकरणाची फार महत्त्वाची भूमिका आहे. मुलांचा सामाजिक विकास हा वयाच्या अगदी पहिल्या महिन्यापासून निदर्शनास येऊ शकतो.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-05-2022 at 00:06 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psychosocial development social development of children social characteristics socialization amy