पालघर जिल्ह्यात पावसाची उसंत

पालघर: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पावसाने हाहाकार माजवल्यानंतर शुक्रवारी पावसाने उसंत घेतली. जिल्ह्यातली वाहतूक व जनजीवन पूर्वपदावर येत आहे. तर स्थलांतरित केलेले नागरिक घरातील पाणी ओसरल्यामुळे पुन्हा आपल्या घराकडे वळले आहेत. मात्र नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंसह घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याच्या आकडेवारी समोर येत आहे.

दोन दिवस सलग पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले, धरणे दुथडी भरून वाहू लागल्याने नदीकिनारी गावांना याचा मोठा फटका बसला. गावागावांमध्ये पाणी शिरून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांसह घरातील वस्तूंची मोठी नुकसानी झाली होती. नागरिकांचे स्थलांतर ही करण्यात आले होते. शुक्रवारी पावसाने उसंत घेतल्यामुळे हे पाणी आता ओसरू लागले आहे. जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड परिसरामध्ये ठीक ठिकाणी दरडी कोसळल्यानंतर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

सार्वजनिक बांधकाम खात्यासह विविध यंत्रणांनी या दरडी बाजूला सारून रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत केली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून वाहतूक खोळंबली होती. मात्र पाणी ओसरल्यामुळे ती वाहतूकही सुरळीत सुरू झाली आहे. ग्रामीण भागामध्ये गुरुवारपासूनच एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य सुरू केले होते. ग्रामीण भागातील मोखाडा जव्हार वाडा येथील काही रस्ते व रस्त्यावरील लहान साकव पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले होते. तेथेही युद्धपातळीवर काम सुरू असून वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे काम सुरू आहे.

पावसामुळे दरडी कोसळून विविध घटनांमध्ये मृत्यू झालेल्यांना पाच लाखाची सरकारी मदत जाहीर झाली आहे. मात्र पालघर जिल्ह्यातील पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मृतकांची कुटुंबे सरकारी मदतीकडे डोळे लावून आशेने वाट पाहत आहेत.

पूरसदृश स्थिती नियंत्रणात

वाडा, जव्हार, विक्रमगड, मोखाडा तालुक्यातील पूरसदृश स्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळे संभाव्य धोका टळला आहे. पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यामार्फत देण्यात आल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत. जिल्ह्यत विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे काही ठिकाणी पूर्ण केले गेले असून काही ठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या पंचनाम्यानंतरच नेमकी किती नुकसानी झाली हे समोर येणार आहे.