लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर : समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग येत्या ६ एप्रिल नंतर सुरू करण्याचे डीएफसीसीने योजिले असताना पर्यायी पूल उपलब्ध करून देईपर्यंत सफाळे रेल्वे फाटक बंद करू नये याकरिता सफाळे विकास कृती समिती व स्थानिक नागरिकांकडून आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनाच्या निमित्ताने सफाळे बाजारपेठ कडकडीत बंद पाळण्यात आली होती.
सफाळे रेल्वे स्थानका लगतचे फाटक हे ३१ मार्चपासून रोजी कायमस्वरूपी बंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांना व दैनंदिन प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. भाजीपाला, दूध व मासळी घेऊन विरार मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मंडळींना अवजड सामान डोक्यावर घेऊन अस्तित्वात असलेल्या पादचारी पुलावरून प्रवास करावा लागत आहे. सफाळे विकास कृती समिती व नागरिकांकडून आज रेल्वे फाटकाच्या पश्चिमेला जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सफाळे रेल्वे स्थानकालगत असलेले रेल्वे फाटक अचानकपणे बंद करण्यात आल्याने फाटकातून दैनंदिन प्रवास करणाऱ्या ४०- ४५ गावांच्या जवळपास ५० हजार नागरिकांचा पूर्व – पश्चिम संपर्क तुटला आहे. रेल्वे प्रवाशांसोबत बाजाराहाट करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना रेल्वे फलाटावरील पादचारी पुलावरून रूळ ओलांडणे आवश्यक झाले आहे. नवीन पादचारी पुल उभा करण्यासाठी किमान सहा ते आठ महिने लागण्याची शक्यता असून तोपर्यंत नागरिकांची फरफट कायम राहील असे आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले.
सफाळे रेल्वे फाटकात पादचाऱ्यांकरिता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत सफाळे विकास कृती समिती आक्रमक झाली असून पर्यायी व्यवस्था उभी राहीपर्यंत सफाळे रेल्वे फाटक बंद करू नये असा इशारा रेल्वे व्यवस्थापनाला दिला. या संदर्भात आंदोलकांनी खासदार यांच्या समवेत रविवारी सफाळे येथे सभेचे आयोजन केले आहे.
आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने सफाळे रेल्वे स्थानकाबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र आंदोलने शांततेच्या मार्गाने निदर्शना केली व आपले मत मांडल्याने अनुचित प्रकार घडला नाही. सफाळे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. रिक्षा व वाहने पश्चिमेच्या दिशेला उभी करण्यात आली. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
आंदोलनाच ठिकाणी उपजिल्हाधिकारी महेश सागर यांनी भेट घेऊन सफाळे व परिसरातील नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या. त्यांनी समर्पित मालवाहू रेल्वे व्यवस्थापनाच्या प्रतिनिधी समवेत प्रत्यक्षपणे दोन्ही उड्डाणपूलांची पाहणी केली तसेच अस्तित्वात असणाऱ्या पादचारी पुलावरून फेरफटका मारला. आपला अहवाल आपण जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना सादर करणार असून सोमवारी (ता ७) रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठकीचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
पुढील आठवड्यात मालवाहू रेल्वे सेवा सुरू होणार
पश्चिम रेल्वे ची अस्तित्वात असणाऱ्या व्यवस्थेशी समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाची जोडणी करण्यासाठी रविवार पर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानंतर म्हणजे ६ एप्रिल नंतर मालवाहू मार्गीकेवरून वाहतूक सुरू होईल असे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशनने सुचित केले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांनी व प्रवाशांनी रेल्वे लाईन ओलांडू नये असे आव्हान देखील केले आहे.