डहाणू नगर परिषदेच्या हद्दीमध्ये मसोली नाक्याजवळच आंबेडकर नगर या ठिकाणी १००० ते १२०० चे आसपास लोकवस्ती आहे . या ठिकाणी नागरिक छोट्या खोल्यांमध्ये राहतात. त्यामुळे नगरपरिषदेकडून या ठिकाणी २४ शौचालय असणारे स्वच्छतागृह साधारणपणे आठ- दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते; परंतु स्वच्छतागृह बांधल्यानंतर या ठिकाणी कुठलीही देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे या स्वच्छतागृहाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना स्वच्छ आणि नादुरुस्त असलेल्या स्वच्छतागृहामध्ये नाईलाजाने जाऊन त्रास सहन करावा लागत आहे.
डहाणू नगरपरिषदेच्या आंबेडकर नगर मधील सार्वजनिक स्वछतागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या ठिकाणी असलेल्या शौचालयांपैकी बहुतांश शौचालयांचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. रात्रीच्या वेळी या ठिकाणी गेल्यास विजेची सुविधा नाही. स्वछतागृहाची स्वच्छता करणारे कर्मचारी आठवडा आठवडा स्वछता करीत नाहीत. त्यामुळे दुर्गंधी सुटलेली आहे. परंतु नागरिकांना नागरिकांना याच शौचालयांचा वापर केल्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने नाक मुठीत धरून नागरिक याच शौचालयांचा वापर करत आहेत.
हेही वाचा… पालघर : अंगणवाडी केंद्र बंद असल्यामुळे लाभार्थी पोषण आहारापासून वंचित
डहाणू नगरपरिषद एकीकडे दर्शनीय भागातील सुशोभन करण्यावर लाखो रुपये खर्च करत आहे. परंतु वस्त्यामधील स्वछतागृह, कचरा कुंड्या याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे असा आरोप नागरिक करत आहेत. निवडणूक आली की या भागातील नगरसेवक मोठ्या मोठ्या घोषणा करतात. परंतु एकदा निवडणूक होऊन गेली की पुन्हा या भागात फिरकत सुद्धा नाहीत. तरी या शौचालय लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
हेही वाचा… पालघर : ग्रामसेवकाने वापरले जिल्हाधिकारी यांचे अधिकार, एक वेतन वाढ रोखण्याची सौम्य कार्यवाही
आमच्या वस्तीमधील सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दरवाजे तुटलेले आहेत. रात्रीच्या वेळी वीज नाही. दरवाजे तुटलेले असल्याने, निवडक चांगल्या शौचालयांचा वापर करतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. – विनोद मायावंशी, आदिवासी आंबेडकर नगर
शासनाच्या घरोघरी शौचालय ही योजना या भागात देखील राबवली जात आहे. त्यामुळे आंबेडकर नगर येथील सार्वजनिक शौचालयांचा वापर करणाऱ्या रहिवाशांना प्रत्येकी १७ हजार अनुदान वयक्तिक शौचालय बांधकाम अनुदान दिले जाणार आहे. त्यापैकी पहिला हप्ता जमा केलेला आहे. वयक्तिक शौचालय बांधून झाल्यावर हे सार्वजनिक शौचालय बंद केले जाणार आहे. – वैभव आवारे, मुख्याधिकारी डहाणू