वाडा : तालुक्यातील खुपरी येथे असलेल्या ‘ओम पेट्रो स्पेशालिटीज’या कंपनीत सोलापूर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बनावट डिझेल बनविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून १७ कोटी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तालुत्याबाहेरील पोलीस छापे घालून गुन्हे उघडकीस आणत असतानाही स्थानिक वाडा पोलिसांना त्याबद्दल माहिती नसणे याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येते. या प्रकाराबाबत वाडा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सहा महिन्यांपूर्वीच वाडा शहरात बनावट नोटा बनविणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला होता, त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी वाडा तालुक्यातील कुडूस परिसरातील कंपन्यांमधून शेकडो टन लोखंड चोरी करणारी टोळी बोईसर पोलिसांनी मुद्देमालासह पकडण्यात यश मिळविले होते. काल मंगळवारी सोलापूर पोलिसांनी वाडा तालुक्यातील खुपरी येथील एका कंपनीतून मोठय़ा प्रमाणावर बनावट डिझेल बनवून विक्री केली जात असल्याचे उघडकीस आणले आहे.
वाडा तालुक्यात मोठमोठे गुन्हे घडत असताना येथील स्थानिक पोलिसांना याबाबत पुसटशी कल्पना येऊ नये याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
वाडा तालुक्यात खुपरी येथे ओम पेट्रो स्पेशालिटीज ही कंपनी आहे. या कंपनीत रसायनांचा वापर करून बनावट डिझेल तयार करून राज्यात तो वितरित केला जात असे. या कंपनीवर सोलापूर पोलिसांनी छापा घातला. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच मालकाची बिलोशी येथे आणखी एक कंपनी होती. काही वर्षांपूर्वी या कंपनीवर मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी छापा घालून लाखो लिटर नाप्था जप्त केला होता.
दरम्यान सोलापूर पोलिसांनी खुपरी येथील बनावट डिझेल बनविणाऱ्या कंपनीला सील ठोकले असून या कंपनीतून अन्य ठिकाणी किती प्रमाणात बनावट डिझेल विक्री केले गेले आहे याचा शोध सोलापूर पोलीस करत आहेत. या गुन्ह्य़ासंदर्भात वाडा पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता खुपरी येथील बनावट डिझेल प्रकरणाची आमच्याकडे काहीही माहिती नसल्याचे वाडा पोलिसांकडून सांगण्यात आले.