लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : सफाळे रेल्वे स्थानकाच्या उत्तरेला असलेले रेल्वे फाटक काल मध्यरात्रीपासून अचानकपणे बंद करण्यात आले. त्यामुळे पूर्व पश्चिम प्रवास करणाऱ्या तसेच गाड्या पकडण्यासाठी येणाऱ्या दूरवरच्या ४० हजार प्रवाशांपेक्षा अअधिकांची आज सकाळी तारांबळ उडाली.

संजाण ते सफाळे दरम्यान समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग कार्यरत करण्यासाठी पालघर तालुक्यातील सफाळे व नवली (पालघर) येथील रेल्वे फाटक बंद करणे आवश्यक होते. पालघर जिल्हाधिकारी यांनी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही दोन्हीही फाटक बंद करत असण्याच्या अधिसूचना जारी केल्या होत्या. दहावी, बारावीच्या परीक्षा होत असल्याने स्थानिक आणि या निर्णयाला विरोध केला. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर सुरू होऊ पाहणारी समर्पित मालवाहू रेल्वे सेवा रखडली होती.

पालघर च जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून फाटक बंद करण्याबाबत लेखी आदेश जारी करण्यात आले होते. मात्र नागरिकांकडून या आदेशाला कडाडून विरोध झाल्याने नागरिकांना पर्यायी व्यवस्था उभी करेपर्यंत रेल्वे फाटक बंद करू नये असा अभिप्राय त्यांनी कळविला होता.

दरम्यान सफाळे येथे अस्तित्वात असणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाचे विस्तारीकरण करणे, अस्तित्वात असणाऱ्या पुलाच्या उत्तर व दक्षिणेला दोन स्वतंत्र पादचारी पूल उभारणे तसेच माकणे ते सफाळे उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. सफाळा रेल्वे स्थानकात दक्षिणेच्या बाजूच्या प्रस्तावित पादचारी पुलाचे भूमिपूजन झाले असून निसर्गवासी काळूरामकाका धोदडे पुलाचे (माकणे) काम अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसात या पुलावरून वाहतूक सुरू होण्याचे अपेक्षित आहे.

पालघर नवली येथील उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणामुळे विलंबाने होत असले तरी दुचाकी स्वार व पादचाऱ्यांसाठी अस्तित्वात असणाऱ्या रेल्वे फाटकाच्या लगत भूमिगत मार्ग कार्यरत करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची सेवा समाप्ती काल (ता ३१ मार्च रोजी) मध्यरात्री संपली. या पार्श्वभूमीवर त्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार रेल्वे फाटक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सफाळे रेल्वे स्थानकात प्रवाशांची वाहतूक होऊ नये या दृष्टीने जाळ्या व बॅरिकेड लावून अडथळा निर्माण केला असून समर्पित रेल्वे मालवाहू मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

तीन दिवस सुट्टी उपभोगल्यानंतर आज पहाटेपासून रेल्वे सेवा वापरण्यासाठी आलेल्या नागरिकांना अचानकपणे बंद झालेल्या या फाटकामुळे मोठ्या गैरसोयी ला सामोरे जावे लागले. अस्तित्वात असणाऱ्या पादचारी पुलाचा वापर करून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या पकडण्यास तारांबळ उडाली, तर अनेक प्रवाशांच्या गाड्या चुकल्याचे रेल्वे प्रवासी संघांकडून सांगण्यात आले. रेल्वे फाटक बंद करण्यापूर्वी किमान फलक लावणे आवश्यक होते असे मत अनेकांनी व्यक्त केले.

मालवाहू मार्ग सुरू होण्यास अडचणी कोणत्या

पालघर नवली व सफाळे रेल्वे स्थानक बंद झाल्यानंतर सफाळे रेल्वे स्थानका च्या दक्षिणेला समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग व अस्तित्वात असणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या रुळांची जोडणी करणे, विद्युतीकरणाचे काम व सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे प्रलंबित आहे. या कामासाठी सहा ते आठ तासांचा स्वतंत्र ब्लॉक घेणे अपेक्षित असून हे काम पूर्ण झाल्यानंतर गुजरात राज्यातून थेट सफाळे पर्यंत मालगाड्या जाऊ शकणार आहेत.