जून महिन्यात ७४१ मिलीमीटर पाऊस, जुलैमध्ये मात्र प्रतीक्षा

पालघर : पालघर जिल्ह्यात जून महिन्यात ७४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या तुलनेत १८० टक्के पाऊस झाला आहे. जून महिन्यात अधिकांश ठिकाणी २१ दिवस पाऊस झाल्याची नोंद असून महिनाअखेरच्या आठवड्यात तसेच जुलै महिन्याच्या आरंभी पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

जून महिन्याच्या आरंभी तसेच मध्यावर पावसाने दमदार हजेरी लावल्याने यंदा शेतीच्या कामांना लवकर सुरुवात झाली होती. अनेक ठिकाणी भातपिकांच्या खाचरांमध्ये पाणी साचून राहिल्याने व पिकाची समाधानकारक वाढ झाल्याने पुनर्लागवडीच्या कामाला (लावणी) आरंभ झाला होता. असे असले तरी जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर चिंतेचे वातावरण पसरले आहे.

जव्हार व मोखाडा तालुक्यात जून महिन्यात २४ दिवस पाऊस झाला तरी इतर सर्व तालुक्यांत महिन्यातील २० ते २२ दिवस पाऊस झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जून महिन्यात होणाऱ्या सरासरी पावसापेक्षा सुमारे दीडशे टक्के पाऊस झाल्याचे आकडेवारी वरून दिसून येते. पावसाने गेल्या काही आठवड्यांपासून दडी मारल्याने कूपनलिकेचे किंवा विहिरीचे पाणी वापर भात पुनर्लागवडीची कामे काही ठिकाणी सुरू आहेत. तर इतर ठिकाणी शेतकरी पावसाच्या पुनरागमनाची वाट पाहत आहे.