पालघर : पालघर जिल्ह्यातील ३३६ ग्रामपंचायतींमध्ये रविवार, १६ ऑक्टोबर रोजी  मतदान होणार  आहे. अजूनही परतीच्या पावसाचा जोर कायम असल्याने मतदानाच्या पार्श्वभूमीवर तयारी करताना प्रशासनासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मर्यादित खर्चात ग्रामपंचायत निवडणूक घेताना लहरी वातावरणाचा धसका जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी दहा ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची बिनविरोध निवड झाली आहे. तर एके ठिकाणी एकही अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे ३३१ ठिकाणी सरपंचपदांसाठी निवडणूक होत आहे.  त्यासाठी १३३९ उमेदवार रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतमधील ३४९० सदस्यांच्या जागांपैकी ४९ ठिकाणी एकही अर्ज दाखल झालेला नाही.  ७१२  ठिकाणी सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकंदरीत ३३६ ग्रामपंचायतींमध्ये २७२९  ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी  रविवारी निवडणूक होत आहे. त्यासाठी ६६९०  उमेदवार रिंगणात आहेत.

निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम मशीनची तपासणी व ईव्हीएम मशीनला सीलबंद करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व ईव्हीएम मशीन तालुकानिहाय उभारलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहे.  निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून प्रत्यक्षात निवडणूक साहित्य वितरण करण्यासाठी मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचप्रमाणे निवडणूक साहित्य व कर्मचारी यांची वाहतूक करण्यासाठी १६६ एसटी बस, ७३ मिनी बस व २४२ रिक्षा-टॅक्सी व इतर वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. वाढीव (वैतरणा) येथील मतदान केंद्रांवर पोचण्यासाठी बोटीचा वापर करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मर्यादित निधी उपलब्ध झाला असून यामध्ये मतपत्रिकेची छपाई, इतर साहित्याची जमवाजमवी  करणे, निवडणूक कर्मचाऱ्यांचे मानधन व भत्ते देणे तसेच भोजनाची व्यवस्था करताना निधी नियोजनात प्रशासनापुढे अडचणी निर्माण होत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कायम राहिल्याने साध्या मंडपा ऐवजी वॉटरप्रूफ मंडप उभारण्याचा विचारदेखील अनेक तालुक्यांच्या ठिकाणी केला जात आहे. निवडणूक साहित्य सुरक्षितपणे मतदान केंद्रांवर पोहोचवण्याची आवाहन प्रशासनासमोर असून लांबलेल्या परतीच्या पावसामुळे जिल्हा प्रशासनासमोर आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे.

निवडणुकीचा प्रचार थंडच

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्थानिय पातळीवर उमेदवारांचे नाव व चिन्ह असणारे फलक प्रदर्शित करण्यात आले होते. बहुतांश उमेदवारांनी आपल्या आप्तेस्टांसह घरोघरी प्रचारावर भर दिला. अनेक ठिकाणी फलक लावताना ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात आली नसल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी संपल्यानंतर प्रचारार्थ लावण्यात आलेले फलक काढण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतीने दिल्या आहेत. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या समर्थकाने पॅनलनिहाय उमेदवारी अर्ज दाखल केले असून अनेक ठिकाणी तिरंगी व बहुरंगी लढतील होणार आहेत. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येक मताला हजारोंचा मोबदला देण्याचे सुरू असून ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्त पार्टी व मेजवानांना ऊत आला आहे.

निवडणुकीचा तपशील  

    तालुका ग्रामपंचायत      सरपंच ग्रामपंचायत    सदस्य

    डहाणू   ६२ ६१ ६१ ५९५

    तलासरी     ११ ११ ११ १६६

    पालघर ८३ ७८ ८१ ६६०

    वसई   ११ ११ ११ १११

    वाडा    ७० ६६ ६८ ३९८

    विक्रमगड  ३६ ३६ ३६ ३१७

    जव्हार ४७ ४६ ४६ ३१५

    मोखाडा २२ २२ २२ १६७

    एकूण   ३४२    ३३१    ३३६    २७२९