लोकसत्ता वार्ताहर

कासा : पालघर जिल्ह्याच्या शहरी भागासोबत ग्रामीण जिल्ह्यातील जव्हार, मनोर, विक्रमगड, कासा, वरोती, तलासरी अशा भागात मुस्लिम समाजाचे प्राबल्य असून रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. रमजान महिन्यात रोजे ठेवून मुस्लिम बांधवांनी श्रद्धेने उपवास ठेवतात व अखेर चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान ईद साजरा करतात.

रमजान ईद या सणाला मुस्लिम धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. ज्याप्रमाणे हिंदू समाजात दिवाळी, ख्रिश्चन बांधव नाताळ हे सण साजरे करतात त्याप्रमाणे मुस्लिम समाजात रमजान ईद हा सण साजरा केला जातो. रमजान ईद सण आला की नवीन कपडे, सुगंधी अत्तर, शेरवानी कुर्ते, महिलांसाठी हिजाब आणि पारंपरिक पेहराव खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये गोडधोड पदार्थांसाठीही तयारी करण्यात आली होती.

सोमवारी सकाळी, मुस्लिम बांधवांनी नवीन वस्त्र परिधान करून, अत्तर व सुरमा लावून मस्जिदमध्ये जाऊन सामूहिक नमाज अदा केली. नमाज पठणानंतर एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने या सणाचा आनंद लुटला. ईदच्या निमित्ताने घराघरात शीरखुर्मा, बिर्याणी, हलीम, फिरनी आणि इतर पारंपरिक पदार्थांची रेलचेल होती.

कासा, डहाणू, जव्हार, मोखाडा आणि इतर ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच, सर्वत्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुस्लिम समाजातील नागरिकांनी ईदचा आनंद घेऊन सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

रमजान ईद सण हा केवळ धार्मिक नाही, तर बंधुभाव, प्रेम आणि सौहार्द वाढवण्याचा दिवस आहे. रमजान महिन्यात महिनाभर उपवास केल्यानंतर, ईदच्या दिवशी आनंदाने गोडधोड भोजन करून हा सण साजरा केला जातो. पालघर आणि आसपासच्या भागातही यंदा ईद उत्साहात साजरी झाली. अनेक मुस्लिम बांधव आपल्या इतर धर्मीय मित्रांना सुद्धा रमजान ईद निमित्त घरी बोलवून शीरखुर्मा, गोडधोड खाद्यपदार्थ अशी मेजवानी देतात.