लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर : ८० वर्ष पेक्षा अधिक वयोमान असलेले एक दुर्मिळ अशा वरुण वक्ष (वायवरण) सफाळे सोसायटीच्या भात गिरणी जवळ असणारे वृक्ष बऱ्याच वर्षानंतर बहरले असून पांढरट पिवळसर मंद सुगंधी फुलांमुळे हे झाड वाटसरूंचे आकर्षण ठरत आहे.
सफाळ्याच्या प्राचीन वृक्षांमध्ये (हेरिटेज ट्री) या वरूण वृक्षाचे नाव पहिल्या पाचमध्ये अग्रणी आहे. वायवरण हा मध्यम आकाराचा पानझडी वृक्ष आहे. त्याला मोठ्या प्रमाणात शाखा आणि उपशाखा असतात. खोडाची साल फिक्कट तपकिरी रंगाची व पाने फांद्यांच्या टोकांना एकवटलेली असतात. चकचकीत हिरवी नाजूक, पातळ व त्रिदल बेलाच्या पानाशी साधर्म्य असलेले हे झाड हिवाळ्यात पानगळ होऊन बराच काळ निष्पर्ण राहते. मार्च – एप्रिल महिन्यामधे नवीन पालवी आणि फुलांचा बहर एकाच वेळी येतात. यंदा बऱ्याच वर्षनंतर हे झाड बहरल्याने परिसर प्रसन्न वाटत असल्याचे मत वृक्षमित्र व अभ्यासक प्रकाश काळे यांनी व्यक्त केला आहे.
हा पूर्वी भारतात सर्वत्र आढळणारा वृक्ष होता आता सध्या तो दुर्मिळ अवस्थेत आहे. भारतीय एकात्मतेचे जणू प्रतीक असलेला धार्मिक वृक्ष आहे. हा अधिकतर शंकराच्या मंदिराजवळ लावलेला आढळतो तसेच मुस्लिम प्रार्थना स्थळांच्या जवळ, बौद्ध मठच्या परिसरात लावलेले असत याकडे श्री काळे यांनी लक्ष वेधले.
वृक्षाचे वैशिष्ट्य
या झाडाची फुले सुरुवातीला पांढरीशुभ्र नंतर पिवळी, पिवळसर व किंचित लालसर होतात. पाकळ्या चार सुट्या तर पुकेसर आठ ते २० पर्यंत येतात.पुकेसर बाहेर डोकावणारे जांभळे किंवा तांबडत असतात. फळे बोराच्या आकाराची ओलसर असून पिकल्यावर लाल होतात. काही ठिकाणी ती थोडी लांबट ही असतात. याच्या बियांचे कवच कठीण असल्यामुळे त्या रुजून येण्यासाठी बराच काळ लागतो.
आयुर्वेदिक औषधी वृक्ष
सर्व मूत्रविकारांवर व मुतखडा यावर वायवर्ण उपयोगी आहे. याच्या सालीच्या काढ्याने प्रोस्टेट ग्रंथींची वाढ झाली असता मूत्राशयाच्या स्नायूंचे आकुंचन सुधारून लघवी साफ होते. मुतखडा, मुत्राघात, मूत्रशर्करा या सर्व रोगांवर वायवर्ण, गोखरू व सुंठ यांचा काढा गुळ व यवक्षार घालून प्याला असता गुण दिसून येतो. पोटफुगी व अपचन रोगात याच्या पानांचा काढा करून प्यावा. गंडमाला झाल्यास याच्या सालीचा काढा मधाबरोबर द्यावा व गंड माळेचे ठिकाणी लेप लावावा. आयुर्वेदिक औषधी दुकानात याचा बृहत् वरुणादि काढा, वरुणादी वटी अशी मूत्राशयाच्या रोगांवरील अनेक औषधे मिळतात.
विविध नावे
संस्कृत – वरुण, अश्मरअग्नी, त्रिपर्ण
हिंदी – बरुण
तामिळ – माविलिंगु
कन्नड – नारुवेळे
मल्याळम – नीरवाल
गुजराती – वायवरण
बंगाली – बरूण
पंजाबी – बरुआ
झाडांच्या आकर्षणापोटी शोध घेत पालघर पासून सफाळ्याच्या जंगल परिक्षेत्रात फिरतांना असा एवढा मोठा वरुण वृक्ष प्रथमच आढळला. त्याच्या खोडाचा घेर पाच फुटाहून अधिक आहे. सध्या फुललेले हे वृक्ष सफाळा व परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे ठिकाण ठरत आहे. -प्रकाश काळे, वृक्षमित्र, सफाळे