पालघर जिल्ह्य़ात चार महिन्यांत सात मातांचा मृत्यू

नीरज राऊत
पालघर : एकेकाळी जिल्ह्यातील ग्रामीण भागात गृहप्रसूतीचे असलेले ५० ते ६० टक्के प्रमाण हे दोन- अडीच टक्क्यांवर येऊन ठेपले आहे. असे असले तरी अशा प्रसूतीदरम्यान होणारे मातामृत्यू हा जिल्ह्यकरिता अजूनही चिंतेचा विषय ठरत आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत सात मातामृत्यू झाल्याची माहिती मिळते.

पालघर जिल्ह्यत एप्रिल ते जुलै या दरम्यान ७४७३ प्रसूती झाल्या आहेत. त्यापैकी ११२ गृहप्रसूतीचा समावेश आहे. विशेष म्हणजे घरी होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण पाहता तलासरी तालुक्यात ५.८ टक्के, जव्हार  २.४ टक्के, तर  मोखाडा तालुक्यात २.२ टक्के, विक्रमगड व डहाणू येथे प्रत्येकी सुमारे दीड टक्के आहे. याच कालावधीत जव्हार तालुक्यामध्ये तीन, पालघरमध्ये दोन तर तलासरी व वसई ग्रामीण पट्टय़ात प्रत्येकी एक मातामृत्यू नोंदवण्यात आला आहे.

जिल्ह्यातील काही दुर्गम भागांतील पाडे दूरवर असून त्या ठिकाणाहून प्रसूतीसाठी गर्भवती महिलेला मुख्य रहदारीच्या रस्त्यावर आणण्यासाठी झोळीचा वापर करावा लागतो तर काही ठिकाणी राहत्या वस्तीवरून मुख्य गावात संपर्क करण्याची साधने नसल्याने प्रसूतीसाठी वर्दी देणे अथवा आशा सेविकेला कळविणे कठीण होते.

मोबाइल नेटवर्क तसेच इंटरनेटची सुविधा नसल्याने रुग्णवाहिकेला गावामध्ये प्रसूतीकरिता नेण्यासाठी बोलवणे व रुग्णवाहिकेची उपलब्ध असणे हेदेखील गृहप्रसूतीमागील एक प्रमुख कारण आहे. अनेकदा वाहन उपलब्ध होण्यास विलंब झाल्याने रुग्णवाहिकेमध्येच प्रसूती झाल्याची उदाहरणे पुढे येत आहेत. मागास समाजाला रुग्णालयातील प्रसूतीमागील महत्त्व अजूनही समजत नसल्याने कमी-अधिक प्रमाणात प्रसूती घरीच केल्याच्या घटना पुढे येत आहेत.

काही वर्षांपूर्वी उपकेंद्रांमध्ये प्रसूती करण्याची पद्धत प्रचलित होती, मात्र त्या ठिकाणी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने गुंतागुंतीच्या प्रसूतीदरम्यान अडचण निर्माण झाल्यास गंभीर रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करणे जिकिरीचे आहे.  मात्र उपकेंद्रामध्ये प्रसूती करण्यास उत्तेजन दिले जात नसल्याने प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना मोठय़ा प्रसूती केंद्राकडे पाठवण्याची पद्धत अवलंबिली जात आहे. काही उपकेंद्रांमध्ये निवासी परिचारिका असल्याने अशा ठिकाणी दुसऱ्या किंवा तिसऱ्या खेपेच्या प्रसूती केल्या जात असल्याचे दिसून आले आहे. करोनाकाळात रुग्णालयातील सुरक्षिततेबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीतीमुळे गृहप्रसूतीला काही भागांत प्राधान्य देत असल्याचे सांगण्यात आले. मातामृत्यूमागील गृहप्रसूतीचे एक प्रमुख कारण असून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

काही समाजांत गैरसमज

मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी  संस्थात्मक प्रसूती अर्थात दवाखान्यात प्रसूती करण्याबाबत  उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र सिझेरियन प्रसूती करण्याची आवश्यकता भासल्यास महिलेच्या पोटाला कात्री लागेल या भीतीपोटी काही समाजांमध्ये गृहप्रसूती करण्यास पसंती दिली जाते.  बाळाचे वार-नाळ (प्लेसेंटा) हे घराजवळ पुरण्याची पद्धत असल्याने रुग्णालयात प्रसूती केल्यास आपल्याला धार्मिक कार्यासाठी वार मिळणार नाही या समजुतीपोटी रुग्णालयात प्रसूतीसाठी जाण्याचे टाळत असल्याचे सांगण्यात येते.

सन २००५ च्या सुमारास जव्हार येथे गृहप्रसूतीचे प्रमाण ७० ते ७५ टक्के होते ते आता अडीच टक्क्यांवर आले आहे. हे कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून समाजप्रबोधनाची गरज आहे.

— डॉ. किरण पाटील, तालुका वैद्यकीय