पालघर : पालघर तालुक्यात झालेल्या ८१ ग्रामपंचायत निवडणुकीत ३३ ठिकाणी फेरमतमोजणी करण्यात आली. यामध्ये दोन सरपंच व एक सदस्य यांच्या निकालामध्ये बदल झाला. पालघर विधानसभा क्षेत्रात सुमारे ३३० केंद्रे असताना ८१ ग्रामपंचायतींसाठी ३५६ केंद्रे कार्यरत होती. दोन भागांमध्ये ग्रामपंचायतनिहाय मतमोजणीचे आयोजन करण्यात आले असले तरीही प्रत्येक वॉर्डात थेट सरपंचासह दोन सदस्यांसाठी निवडणूक असल्याने व अनेक ग्रामपंचायतीमध्ये तीनपेक्षा अधिक सदस्य रिंगणात असल्याने मतमोजणी दरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.  .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोईसर व मनोर या मोठय़ा ग्रामपंचायतींमध्ये मतमोजणी दरम्यान उत्साही मतमोजणी प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी झालेल्या मतदानाची शहानिशा न करता आपला उमेदवार विजयी झाल्याचे बाहेर कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर विजयी गटाने जल्लोष सुरू केला होता. भादवे येथे देखील सरपंच पदासाठी अन्य उमेदवाराच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला होता. मात्र याबाबत संशय निर्माण झाल्यामुळे फेरमोजणी करण्यासाठी अर्ज करण्यात आले. या दोन्ही ठिकाणी मतांच्या संख्येमध्ये बदल झाला नसला तरी सायंकाळी उशिरापर्यंत संभ्रमासह  वातावरण कायम राहिले.

दरम्यान मतमोजणी प्रक्रियेत बदल झाल्याची खबर तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली व अनेक अफवांना पेव फुटले.  त्यामुळे टेन व बऱ्हाणपूर या ग्रामपंचायतीमधील सरपंचपदाच्या तर पंचाळीमध्ये एका सदस्याच्या निकालावर परिणाम झाल्याने  गोंधळात भर पडली. बेटेगाव येथे ईव्हीएम मशीनमध्ये दोष  निर्माण झाल्याने एका उमेदवाराला शंभर मतांचा लाभ झाला. मात्र त्याचा निकालात परिणाम झाला नव्हता.  ३३ पेक्षा अधिक ठिकाणी फेरमोजणी करण्याचे अर्ज करण्यात आले. महसूल कर्मचाऱ्यांनी उमेदवारांच्या मागणीनुसार फेरमोजणी करून त्यांच्या शंकांचे निरसन केले. यामुळे रात्री ९.३० वाजेपर्यंत तहसील कार्यालयात एकच गर्दी उफाळून आली होती. मतदानाच्या वेळी पालघर तालुक्यात ६५ ठिकाणी ईव्हीएम यंत्रात वेगवेगळय़ा प्रकारचे दोष निर्माण  झाले होते.

चूक कशी झाली ?

एकाच ईव्हीएम मशीनवर सरपंच, अनुसूचित जमाती व प्रभागातील इतर उमेदवार असल्याने मतमोजणी दरम्यान वेगवेगळ्या कागदांवर मतांची नोंदणी करताना या शीटची अदलाबदल झाल्याचे तसेच उमेदवारांच्या नावांच्या क्रमांकामध्ये बदल झाल्याचे प्रथमता दिसून आले. त्यामुळे मतांची अदलाबदल होऊन चुकीचे उमेदवार तीन ठिकाणी विजयी झाल्याचे प्रथमत: घोषित करण्यात आले होते.  फेरमोजणी दरम्यान चुका दुरुस्त केल्या.  सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक दोष असल्याने मोजलेली मत नोंदवण्यासाठी व त्याची फेर तपासणी करून निर्णय देण्यास विलंब लागत होता. 

बोईसरमध्ये सर्वाधिक गोंधळ

बोईसर ग्रामपंचायतचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अनिल रावते यांना विजयी घोषित केल्यानंतर दुपारनंतर गोंधळ झाल्याचे सांगून मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून मतमोजणी रोखण्यात आली. असे करणे चुकीचे असल्याचा आरोप बोईसर येथील बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी केला. हा लोकशाहीवर आघात असून अनिल रावते यांचा विजय घोषित केला असताना ही यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली येऊन काम करत असल्याचा आरोप आमदार  यांनी केला. मतमोजणीमध्ये गोंधळ उडाल्यानंतर आमदार राजेश पाटील यांनी स्वत: पालघरच्या निवडणूक निर्णय कार्यालयात येऊन याप्रकरणी अधिकाऱ्यांची भेट घेतली.

बोईसर ग्रामपंचायतीचा निकाल राखीव

 बोईसर ग्रामपंचायतीत फेरमतमोजणीत पाच मते मोजली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकृत निकाल राखून ठेवला गेला. या बाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. त्यांच्या मंजुरीनंतरच निकाल जाहीर करून अधिकृत उमेदवार घोषित केला जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकारी वर्गाने दिली आहे.

काही ग्रामपंचायतीच्या  सरपंच व इतर तीन मतपत्रिका होत्या. सरपंच उमेदवार व अनुसूचित जमाती उमेदवारांच्या मतांमध्ये अदलाबदल झाल्याने दोन सरपंच व एक सदस्याच्या निकालावर परिणाम झाला. ही बाब निवडणूक निर्णय अधिकारी यांना उलट तपासणीच्या वेळी लक्षात आली. त्यामुळे फेर मतमोजणी करण्यात आली. याखेरीज  इतर २८ ठिकाणी झालेल्या फेर मतमोजणीमधून कोणताही बदल आढळून आला नाही.  

 -सुनील शिंदे, तहसीलदार, पालघर

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recounting 33 places in palghar gram panchayat in the election recount ysh
Show comments