डहाणू तालुक्याच्या स्थानिक बाजारपेठेत दाखल झालेला लाल मुळा सध्या सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. थंडीची चाहूल लागताच सामान्य पाढऱ्या मुळ्यासह लाल मुळे बाजारात दाखल झाले असून आकर्षक रंग आणि चवीमुळे खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. डहाणूसह तलासरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाल मुळ्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली असून स्थानिक बाजारपेठेतील मागणीमुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.

पालघर जिल्ह्यातील शेतकरी सध्या नगदी पिकांकडे वळताना दिसत आहे. भाजीपाला लागवड करून स्थानिक बाजारपेठेत त्याची किरकोळ विक्री करून शेतकरी नफा मिळवत आहेत. जिल्ह्यात गवार, मिरची, भेंडी, दुधी, कारले, सामान्य मुळ्यासह आता प्रायोगिक तत्वावर शेतकऱ्यांनी लाल मुळ्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली असून लाल मुळ्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील कासा, गंजाड, आशागड, तलासरी, आछाडसह राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला स्थानिक विक्रेत्यांकडे लाल मुळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आकर्षक लाल, गुलाबी रंग, पातळ साल आणि सामान्य मुळ्यापेक्षा चविष्ट असल्यामुळे लाल मुळ्याला खवय्यांची पसंती मिळत आहे. सध्या पांढऱ्या मुळ्यापेक्षा लाल मुळा खरेदी करण्याकडे कल वाढला असून याची चांगली किंमतदेखील मिळत आहे.

हेही वाचा – शहरबात : समस्यांच्या जाळ्यात मच्छीमार…

लाल मुळा अजूनही शेतकरी आणि नागरिकांसाठी नवीन आहे. या मुळ्याच्या विशिष्ट रंगामुळे आकर्षणाचा विषय ठरत असून गोल आणि सामान्य मुळ्याप्रमाणे लांबट अशा दोन आकारात लाल मुळा बाजारात उपलब्ध आहे. काही मोजक्या शेतकऱ्यांकडून प्रायोगिक तत्त्वावर या मुळ्याची लागवड करण्यात आली असून स्थानिक बाजारपेठेत मिळणारा प्रतिसाद पाहून येत्या काळात बहुतेक शेतकरी लाल मुळ्याच्या शेतीकडे वळतील असा अंदाज जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे.

लाल मुळ्याबद्दल लोकांची उत्सुकता वाढू लागली आहे. सामान्य मुळ्यापेक्षा लाल मुळा अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतो. याचा रंग लाल किंवा गुलाबी असून साल पातळ असते. अँथोसायानिन आणि पेलार्गोनिडीन या प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या घटकामुळे मुळ्याला लाल किंवा गुलाबी रंग प्राप्त होतो. लाल मुळा जैवसंपृक्त (बायोफॉर्टीफाईड) वाण म्हणून ओळखला जातो. याचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च (ICAR) यांनी लाल मुळा सॅलडसाठी उत्कृष्ट असून त्यातील अँटिऑक्सिडंट्सची पातळी सामान्य मुळ्याच्या तुलनेत ८० टक्केहून जास्त असल्याचे सांगितले आहे. तसेच लाल मुळ्यामध्ये ‘ब’ जीवनसत्त्वाचे प्रमाणदेखील सामान्य मुळ्याच्या तुलनेत अधिक आहे. लाल मुळा शरीरातील पेशी दुरुस्त करण्यासाठी अधिक फायदेशीर आहे. यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने ते पचनसंस्था निरोगी ठेवते आणि बद्धकोष्ठता टाळते. लाल मुळा तुमच्या सॅलडची चव वाढवतो. त्यासोबतच हे भूक भागवण्यासदेखील मदत करते.

हेही वाचा – पालघर : उपनगरीय क्षेत्रातील रेल्वे प्रवासी उपेक्षित

लाल मुळ्याची पानेदेखील सामान्य मुळ्यापेक्षा चवदार असतात आणि त्यामध्ये जास्त पोषक तत्व असतात. त्यामुळे लाल मुळ्याला बाजारात सामान्य मुळ्यापेक्षा अधिक मूल्य मिळते.

Story img Loader