निखिल मेस्त्री
पालघर: पालघर जिल्ह्यातील सुमारे एक हजार दोनशे अंगणवाडय़ांमध्ये शून्य ते सहा वर्षांच्या लाभार्थी बालकांना आहार तयार करून देण्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. आहारासाठी दिले जाणारे पैसे महागाईच्या तुलनेत कमी असल्याचे कारण देत हे काम त्यांनी थांबविले आहे.
जिल्ह्यातील अंगणवाडय़ांमध्ये गरोदर व स्तनदा मातांसाठी अमृत आहार योजना राबवली जात आहे, तर शून्य ते सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना अंगणवाडीमधून गरम ताजा व पौष्टिक आहार शिजवून दिला जातो. अमृत आहार हा आधीपासूनच अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत दिला जातो. तर गरम ताजा आहारासाठी बचत गट नेमण्यात आले आहेत. अमृत आहार योजनेसाठी ३५ रुपये प्रति लाभार्थी तर गरम ताजा आहारासाठी आठ रुपये प्रति लाभार्थी अनुदान शासनामार्फत दिले जाते.
गेल्या काही महिन्यांमध्ये खाद्यतेल, घरगुती गॅस सिलेंडर, किराणा सामान, कडधान्य, तांदूळ अशा जिन्नसांच्या किमती अवास्तव वाढल्या आहेत. त्यामुळे बालकांना आहार पुरवणे बचत गटांना परवडणारे नाही. म्हणून त्यांनी काम थांबवण्याचा निर्णय घेतला, असे सांगण्यात येते. आता या कामाची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे. मात्र त्यांनीही आपली आर्थिक स्थिती आणि महागाईचे कारण देत काम थांबविले आहे.याआधीच अनेक कामांचा अतिरिक्त भार अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांवर आहे. त्यामुळे काही ठिकाणी हा आहार शिजवून देणे शक्य होत नसल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते.
खर्च न परवडणारा
एका अंगणवाडीमध्ये किमान वीस लाभार्थी बालकांना गरम ताजा आहार दिला जातो. तर सुमारे पाच ते दहा गरोदर व स्तनदा माता अमृत आहार घेत आहेत. अमृत आहाराचे प्रत्येक लाभार्थी ३५ रुपये व गरम ताजा आहाराचे प्रत्येक लाभार्थी आठ रुपये असे ४३ रुपये एका लाभार्थीमागे खर्च करावे लागतात. या सर्व लाभार्थी मिळून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवसाकाठी पाचशे ते सहाशे रुपये खर्च होतो. सध्या सर्व कडधान्य, खाद्यतेलाचे दर १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. वाढत्या महागाईमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कमी पैशात आहार शिजवून देणे शक्य नाही. खर्च केल्यानंतर बिल जमा करावे लागते. त्यानंतर त्यांना पैसे मिळतात. आधी सामान आणून खर्च करण्याची त्यांची परिस्थिती नसल्यामुळे त्यांना गरम ताजा आहार शिजवून देणे परवडेनासे झाले असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
अंगणवाडी कर्मचारी वर्गाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आयुक्त कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याबाबतीत त्यांच्याशी संयुक्त बैठकही लावण्यात आली होती.– गणेश मांते, प्रभारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास
अंगणवाडी कर्मचारी वर्गावर आधीच अनेक कामांचा बोजा आहे. त्यात गरम ताजा आहार शिजवून देण्यासाठी तगादा लावला जातो. भीषण महागाईत तो परवडणारा नाही. शासन-प्रशासन नेहमी अंगणवाडी कर्मचारी वर्गाची चेष्टा करते की काय असा प्रश्न पडत आहे.– राजेश सिंग, सचिव, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ