पालघर: बहाडोली वैतरणा नदीत अडकलेल्या जीआर इन्फ्रा या कंपनीच्या कामगारांना जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफ यांनी तब्बल १२ तास अथक प्रयत्न करून वाचवले. मात्र रेड अलर्ट दिलेला असताना कामगारांचा जीव अशाप्रकारे धोक्यात टाकणाऱ्या कंपनीवर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही.

पालघर जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असताना शिवाय मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना, मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या कामासाठी जीआर इन्फ्रा या कंपनीने बहाडोली वैतरणा नदीमध्ये आपल्या १० कामगारांना बार्जवर धाडले होते. बहाडोली येथील वैतरणा नदीपात्रात मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाच्या पुलाचे काम सुरू होते. बुधवारी मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात हे दहा कामगार बार्जवर नदीपात्रात अडकून पडले होते. रात्री उशिरा एनडीआरएफच्या २० जवानांची तुकडी वसई-विरारहून मदतकार्यासाठी दाखल झाली. परंतु पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. नदीला पूर आला होता. त्यामुळे या मदतकार्यासाठी एनडीआरएफची तुकडी तब्बल १२ तास झुंजत होती.
रात्रीच्या वेळी पुराचे पाणी वाढल्याने तसेच पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने बचावकार्य करणे शक्य नव्हते. तसेच हेलिकॉप्टरही रात्री येणे शक्य नसल्याने सुमारे दहा तास बचावकार्य थांबले होते.

शेवटी गुरुवारी पहाटे पावसाचा जोर कमी झाल्यानंतर या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, प्रांत धनाजी तोरसकर, तहसीलदार सुनील शिंदे, अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी, महसूल प्रशासन आदी अधिकारी-कर्मचारी रात्रभर घटनास्थळी लक्ष ठेवून होते.जिल्हा प्रशासनाने पावसाच्या परिस्थितीविषयी सावधानतेचा इशारा दिला असतानाही या सूचनेकडे दुर्लक्ष करून जीआर इन्फ्रा या कंपनीने आपले काम सुरूच ठेवले.

या मदतकार्यादरम्यान पाण्याची पातळी वाढल्याने कामगारांबरोबरच एनडीआरएफच्या जवानांच्या जिवालाही धोका निर्माण झाला होता. या सगळय़ांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कंपनीला जाब कोण विचारणार, या सगळय़ांच्या जिवाची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

Story img Loader