पालघर : द्रुतगती मालवाहू मार्ग तसेच उपनगरीय रेल्वे चौपदरीकरण प्रकल्पाचे काम सध्या जोरात सुरू असून या प्रकल्पालगत असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व जिल्हा परिषदेच्या अख्यातीमधील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न केल्यास या मार्गावरून पावसाळ्यात वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विरार ते डहाणू रोड दरम्यान अस्तित्वात असणाऱ्या रेल्वे मार्गाच्या पश्चिमेच्या बाजूला उपनगरीय रेल्वेची चौपदरीकरण हाती घेण्यात आले असून सध्या असलेल्या रुळांच्या पूर्वेच्या बाजूला समर्पित द्रुतगती मालवाहू मार्गाचे काम जोरात सुरू आहे. या रेल्वे वाहतुकीच्या नव्या मार्गासाठी मोठय़ा प्रमाणात मुरूम-मातीचा भराव तसेच खडीचा वापर होत आहे. यासाठी ४० टनापेक्षा अधिक वजनाच्या मालवाहू वाहनांची वर्दळ आहे. यामुळे या प्रकल्प लगतच्या भागांमध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत रस्त्यांना अवजड वाहनांमुळे तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी मोठय़ा आकाराचे व खोलीचे खड्डे निर्माण झाले आहेत.
बोरीगाव, बोर्डी, घोलवड, डहाणू, वाणगाव, बोईसर, पालघर, केळवा रोड व सफाळा या रेल्वेस्थानकाच्या दुतर्फा असणाऱ्या अनेक रस्त्यांची व गावांना जोडणाऱ्या जोड रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे. मात्र रेल्वे विस्ताराचे काम सुरू असेपर्यंत दुरुस्ती केली तरीही रस्त्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. या रस्त्यांकडे स्थानीय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने समर्पित मालवाहू मार्ग तसेच पश्चिम रेल्वेकडे निधीची मागणी केली असली तरी त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी न केल्यास आगामी काळात हलाखीचे दिवसाला सामोरे जावे लागेल अशी भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासन याबाबत कोणतीही उपाययोजना करत नसल्याने अनेक ठिकाणी स्थानिकांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader