पालघर : निर्बधाच्या काळात पालघरमध्ये काही ठिकाणी मद्यविक्रीची दुकाने, परमीट रूम, हॉटेल, उपाहारगृहे खुलेआम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत परवानगी असताना ती रात्री १२ वाजेपर्यंत सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांना संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. तर हॉटेल, उपाहारगृहांना त्यांच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांना प्रवेशास परवानगी दिली जाते. चार वाजेनंतर या आस्थापनांनी रात्री आठ वाजेपर्यंत पार्सल सेवा द्यायची आहे. मात्र पार्सल सेवा न देता थेट ग्राहकांना प्रवेश देऊन निर्बंध पायदळी तुटवडे जात आहेत. काही जणांवर कारवाई केल्याचा भास उत्पादन शुल्क, पोलीस यंत्रणा करीत आहे. मात्र अर्थपूर्ण संबंधामुळे हे खुलेआम सुरू असल्याचे सांगितले जाते. दुकाने वेळेनंतर सुरू ठेवण्यासाठी पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला हजारो रुपयांचे हप्ते दिले जातात, असे काही हॉटेल व बारचालकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले आहे. पालघरमधील एका बारचालकाने तर उत्पादन शुल्काच्या डहाणू, बोईसर व पालघर या तिन्ही पथकांना दरमहा १५ हजार रुपयांचे हप्ते द्यावे लागतात असे म्हटले आहे. शनिवार, रविवारी या आस्थापना ग्राहकांसाठी बंद असल्या तरी पार्सल सुविधा सुरू राहण्याचा सूचना आहेत. मात्र या सर्व आदेशांना केराची टोपली दाखवली जात आहे.