रमेश पाटील
मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी धास्तावले
वाडा : वाडा तालुक्यातील शेती उत्पादनावर करोनाचा सावट पसरले आहे. निर्बंधामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप हंगाम जवळ आलेला आहे. पेरणीपूर्वी शेतीतील करावयाच्या मशागतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यंत भाताचे कोठार म्हणून वाडा तालुक्याची ओळख आहे. वाडा तालुक्यात पिकविला जाणारा झिणी, सुरती व वाडा कोलमचा तांदुळ सर्वदूर प्रसिद्ध आहे. मोठय़ा प्रमाणावर भाताचे उत्पादन घेणारा शेतकरी या वर्षी प्रथमच मजुरांअभावी मोठय़ा अडचणीत सापडला आहे.
तालुक्यात १७५०० हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. तालुक्यात भात लावणी, कापणी, झोडणीसाठी यांत्रिक पद्धतीचा अभाव असल्याने ही कामे मजुरांकडूनच करून घ्यावी लागतात. वाडा तालुक्यात या पुर्वी स्थानिक मजुरांची उपलब्धता होती. मात्र गेल्या दहा वर्षांंपासून येथील मजुरांना शासनाने कसण्यासाठी मोठय़ा संख्येने वनपट्टे दिल्याने या वनपट्टय़ांमध्ये येथील मजूर काम करीत आहेत. वाडा तालुक्यात साडेचार हजार मजुरांना येथील जंगल पट्टय़ातील दीड हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र भात, नाचणी, तूर, उडीद पिकांचे उत्पादन घेण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे हे स्थानिक मजूर शेतकऱ्यांकडे काम करण्यास न जाता स्व:ताच्या वनपट्टय़ांमध्येच काम करीत आहेत. स्थानिक मजूर मिळत नसल्याने येथील शेतकरी नाशिक जिल्ह्यतील ग्रामीण भागातून भातशेतीची सर्व प्रकारची कामे करण्यासाठी मजूर आणत असतात. गेल्या दहा वर्षांंपासून वाडा तालुक्यात नाशिक जिल्ह्यतून खरिपाच्या हंगामात १० ते १२ हजार मजूर दरवर्षी येत असतात. यावेळी या मजुरांच्या शोधात येथील शेतकरी गेले असता अनेकांनी करोनाचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव असल्याने शेतीच्या कामासाठी येण्यास नकार दिला आहे. बाहेरगावावरून येणाऱ्या बहुतांशी मजुरांचे अजूनपर्यंत कोविड लसीकरण झालेले नाही. वाडा हा तालुका मुंबई, ठाणे, कल्याण या शहरापासून जवळचा असल्याने करोनाचा जास्त प्रादुर्भाव असल्याचा समज नाशिकमधील मजुरांचा झाला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अशा संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाकडे वळण्याची काळाची गरज आहे, याकडे सांगे येथील कृषीभूषण शेतकरी अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी गटसमुह पद्धतीने शेती करण्याची तयारी दर्शविल्यास यांत्रिकीकरणाची सुविधा उपलब्ध करून देता येईल, असे वाडा विभागाचे तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांनी सांगितले.
जादा दर देऊनही मजूर मिळेना
भात शेतीच्या कामासाठी नाशिक जिल्ह्यतून येणाऱ्या मजुरांना प्रतिदिन सकाळच्या न्याहरीसह दोन वेळचे जेवण व ४०० ते ४५० रुपये मजुरी दिली जाते. यावेळी मजुरीचा दर जास्त देण्याचे सांगुनही करोना या संसंर्गजन्य आजाराच्या भीतीपोटी मजूर येण्यास नकार देत आहेत. मजूर उपलब्ध झाले नाही तर येथील अनेक शेतकऱ्यांवर आपली जमीन ओसाड ठेवण्याची वेळ येईल.