पालघर नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : लोकहिताचा प्रकल्प या नावाखाली गुजरात गॅस कंपनीमार्फत पालघर नगर परिषद हद्दीत गॅसवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले. मात्र रस्ता खोदल्यानंतर तो पूर्ववत करण्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची तसेच पदपथांचीही दुर्दशा झाली आहे. याकडे नगर परिषद प्रशासनही गांभीर्याने पाहत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

सुमारे दोन महिन्यांपूर्वी गुजरात गॅस कंपनीकडून वाहिनी टाकण्याचे काम दिलेल्या ठेकेदारांमार्फत पालघर कचेरी रस्ता येथे काम सुरू करण्यात आले होते. खोदकाम करताना कचेरी रस्त्याच्या न्यायालय परिसरात रस्त्याच्या समांतर असलेल्या गटाराला व पदपथावर जेसीबीद्वारे थेट खोदकाम केले गेले. काम सुरू करताना कोणत्याही तांत्रिक बाबी न तपासता कोणत्याही अधिकारी वर्गाच्या परीक्षणाखाली हे काम न करता थेट खोदकाम केले गेले. हे खोदकाम करताना नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेले गटार व पदपथ संपूर्णत: उखडले गेले. त्यामुळे रस्त्यासह पदपथांची दयनीय अवस्था झाली आहे. 

काम पूर्ण झाल्यानंतर खड्डय़ांमध्ये माती भराव करून पदपथावरील ब्लॉक्स असेच रचून ठेवले गेले. नगर परिषदेच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर नगर परिषदेनेही संबंधित ठेकेदाराला हे काम सुस्थितीत करा असे सांगितले नाही. त्यानंतर आजतागायत रस्त्याची दुरवस्था कायम आहे. पदपथावर टाकले जाणारे पेव्हर ब्लॉक पंचायत समितीपासून ते थेट जुने जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत अस्ताव्यस्त पडले असून ते व्यवस्थित रचले गेलेले नाहीत. यामुळे पदपथावरून चालताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबरीने वाहनांनाही अडथळा ठरत आहेत. काम सुरू करताना ठेकेदाराने कामापोटी अनामत रक्कम नगर परिषदेकडे जमा केल्याचे प्रशासनामार्फत सांगितले गेले असले तरी नगर परिषदेनेही त्या अनामत रकमेतून आजतागायत काम करून घेतलेले नाही. 

लोकहितासाठी असे प्रकल्प आणायचे व ठेकेदारांनी तकलादू कामे करून त्याच लोकांना याचा त्रास व्हावा हे योग्य नाही. रस्ता व पदपथांचे काम तातडीने सुस्थितीत करावे अन्यथा यापुढे हे काम करू दिले जाणार नाही.

-रोहिणी अशोक अंबुरे, नगरसेविका

गॅस वाहिनीच्या कामाचे पैसे संबंधित यंत्रणेने नगर परिषदेकडे जमा केलेले आहेत. सभेपुढे हा विषय आला होता. लवकर निविदा प्रक्रिया करून काम केले जाईल.

-स्वाती देशपांडे-कुलकर्णी, मुख्याधिकारी, नगर परिषद, पालघर