पालघर : नवीन मुख्यालय इमारतमध्ये पालघर जिल्हा परिषदेचे सर्व कार्यालय सामावल्यानंतरही विलंबाने कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे उपहासात्मक स्वागत केले.
दिवाळीच्या सुट्टीनंतर कार्यालयांमध्ये कर्मचारीवर्ग कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून कामावर वेळेत न आलेल्या व येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची ही मोहीम सुरू आहे. कामावर विलंबाने येणाऱ्या सुमारे ७० ते ८० कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देण्यात आले आहेत. याचबरोबरीने कामावर उशिराने येण्याचे कारण व खुलासा वजा नोटिसाही त्यांना बजावलेल्या आहेत. याचबरोबरीने संबंधित विभागप्रमुखांनी कर्मचारी विलंबाने येत असल्याबाबतचे खुलासे मागवले आहेत. जिल्हा परिषदेच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व कामकाज व्यवस्थितरीत्या चालण्यासाठी अशा प्रकारची कारवाई आवश्यक आहे व कार्यालयीन शिस्त महत्त्वाची आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत येण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. यापुढे अधिकारी वर्गाने ही अशी हयगय केल्यास त्यांच्यावर ही अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.