कासा: डहाणू तालुक्यातील धानिवरी गावात गावदेव पूजा निमित्त गावात कायदा व सुव्यवस्था, एकोपा आणि समाजात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने गावपातळीवर वरून विविध नियम लावण्यात आले आहेत. यामध्ये बालविवाह रोखणे व अठरा वर्षा खालील प्रसुती टाळण्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यू रोखण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल असून या निर्णयाचा पंचक्रोशीत स्वागत होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बालविवाह हा कुपोषण व संबंधित समस्यां मागील प्रमुख कारण असून ते रोखण्यासाठी शासनाने अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र रूढी परंपरा व आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा अभाव यामुळे शासकीय नियम धाब्यावर बसून १२ ते १६ वयोगटात अनेक मुला मुलींची लग्न राजरोसपणे होताना अजूनही दिसून येते. समाजप्रबोधनासाठी शासनाने अनेक जनजागृती कार्यक्रम राबविले असले तरीही त्यावर झालेल्या लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याचे चित्र आहे. डहाणू तालुक्यातील धानिवारी ग्रामपंचायत केले बालविवाह होऊ न देण्याचा तसेच विद्यमान परिस्थितीत १८ वर्षाखालील तरुणीचा विवाह झाल्या असल्यास त्यांची प्रसूती १८ वर्षापुढे लांबवण्यासाठी गाव पातळीवर निर्णय घेतला आहे.

हेही वाचा… सफाळे रामबाग जवळ तीन दुचाकींचा विचित्र अपघात; एक ठार तीन जखमी

त्याचबरोबरने गावात चोरी आणि प्रदूषण सारख्या मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. तसेच गावकऱ्यांनी केलेल्या नियमांना बगल देणाऱ्यांवर गावपातळीवरून कारवाई करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

आदिवासी बहुल भागातील धानीवरी, देऊर आणि दहिगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत गावदेव पूजेत हे सर्व नियम लावण्यात आले आहेत. समाजातील अशिक्षितपणा आणि गैरसमजांमुळे लोक विकासाच्या दृष्टीने मागे पडत आहेत. त्यामुळे गावात जनजागृती होऊन नागरिकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी धानीवरी ग्रामस्थांनी विविध नियम लावून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या प्रयत्न केला आहे. गावातील नागरिकांच्या हितासाठी आणि आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून धानीवरी ग्रामस्थांनी इतरांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

नियमावली मध्ये अल्पवयीन मुलांचे लग्न, शासकीय मालमत्तेचे नुकसान, पाणी प्रदूषण आणि चोरी सारख्या विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांच्या विरोधात गावपातळीवर कठोर कारवाई करून दंड वसूल करण्यात येणार असून आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

हे सर्व नियम ग्रामस्तरावर लावण्यात आले असून नियमांचे पालन करण्याची जबाबदारी गावातील सरपंच आणि सदस्य, तंटामुक्त समिती, पेसा गाव समिती, वनहक्क समिती आणि सामूहिक वनहक्क समितीला देण्यात आली आहे.

महत्वाचे नियम

  • गावात बालविवाह करू नये अथवा मुलगा मुलगी अल्पवयीन असताना लगी गरोदर राहिल्यास अथवा प्रसुती झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार संबंधित जोडपे आणि त्यांचे आई वडील असतील व त्यांच्यावर कारवाई करून त्यांना पोलिसात देण्यात येईल.
  • गावात शासकीय अथवा खाजगी मालमत्तेत चोरी अथवा नुकसान करू नये.
  • नदीच्या पाण्यात मासेमारी करताना औषध टाकणं, काडतूस टाकणं अथवा विजेचा शॉक देण्यास बंदी.
  • गावातील ग्रामदेवतांच्या पूजा विधीच्या नियमांचे काटेकोर पालन करत पूर्वापार पासून चालत आलेल्या नियमांचे पालन करावे.

या नियमांचे उल्लंघन केल्यास अथवा नियम उल्लंघन करण्यास मदत करणाऱ्यांवर ग्रामस्तरावरून कारवाई करून दंड वसूल करण्यात येऊन संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यात अल्पवयीन प्रसुती झाल्यास त्या संदर्भात वैद्यकीय क्षेत्राकडून पोलिसांना सुचित करण्याचे प्रक्रिया राबवण्यात येत असून अनेक विवाहित तरुणांवर अल्पवयीन प्रसुती च्या कारणा अन्वये पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे या पार्श्वभूमीवर धानिवरी ग्रामपंचायतीने घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण आहेत

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rules to prevent child marriages in dhaniwari village dvr