नीरज राऊत
पालघर तालुक्यातील किनारपट्टीच्या गावात बिबट्याने एका लहान मुलावर हल्ला केल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे बिबट्याचा वावर असल्याबाबत समाजमाध्यमांवर अफवांचे पीक आले होते. वन विभाग २० ते २५ ठिकाणी पाहणीसाठी गेल्यानंतरही त्यांना एकाही ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचा ठोस पुरावा मिळालेला नाही.
कुडण येथील एका सात वर्षीय मुलावर एका जंगली जनावराने २८ नोव्हेंबर रोजी हल्ला करून त्याला जखमी केले होते. त्या वेळी धुक्याचे सावट असल्याने हल्ला करणारा प्राणी हा बिबट्या असावा असा तर्क बांधण्यात आला. तत्पूर्वी १४ नोव्हेंबरच्या रात्री बीएआरसीत गस्तीवर असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्याला बिबट्या दिसल्याने हा हल्ला बिबट्याने केला असल्याचा तर्क परिसरातील रहिवाशांनी काढला. त्यानंतर सालवड, पास्थळ, कोळगाव, कुडण, ऊनभाट, पोफरण, दांडी व किनारपट्टीच्या अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर संदर्भात अनेकदा संशय व्यक्त करण्यात आला. आपल्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या २० ते २५ तक्रारी वन विभागाकडे करण्यात आल्या. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारींच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर कोणत्याही ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याचे ठोस पुरावे उपलब्ध होऊ शकले नाहीत.
बिबट्याचा वावर असल्याचे तपासण्यासाठी १० ट्रॅप कॅमेऱ्यांचा आलटून पालटून वापर करण्यात येत आहे. मात्र गेल्या तीन आठवड्यांच्या कालावधीत कोणत्याही ठिकाणी बिबट्याची हालचाल कॅमेऱ्यामध्ये टिपली गेलेली नाही. त्यामुळे बिबट्याचा या भागात मुक्तसंचार असल्याचा पुरावा वन विभाग आपल्या वरिष्ठांकडे देऊ शकलेले नाहीत. परिणामी पिंजरा बसविणे अजूनही शक्य झालेले नाही.
हेही वाचा >>> पालघर : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष, जिल्हा मुख्यालय तसेच पालघर परिसरातील अतिक्रमण कायम
थंडीचा हंगाम हा बिबट्यांचा विणीचा हंगाम मानला जातो. या काळात नर, मादी परस्परांच्या शोधामध्ये आपल्या राहत्या ठिकाणापासून बाहेर पडतात, असे सांगितले जाते. बिबट्यासंदर्भात पुढे आलेल्या तक्रारींची शहानिशा केली असता एकाही ठिकाणी नागरिकांवर हल्ला झालेला नाही. तसेच हल्ल्यामध्ये सेवन केलेल्या प्राण्यांचे अवशेष सापडले नसल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.
बिबट्याच्या वावरामुळे ग्रामीण भागातील तसेच गाव-पाड्यांत वस्तीबाहेर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ते निवळण्यासाठी वन विभागाने जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. रात्रीच्या वेळी लहान मुले, वृद्धांनी एकट्याने फिरू नये, फिरताना पुरेशा प्रकाशासाठी चांगल्या दर्जाची ‘टॉर्च’ अथवा दिवा सोबत असावा. तसेच एकट्याने फिरताना ध्वनी उपकरण वाजवत बाहेर पडावे, असे सूचित करण्यात आले आहे. तसेच बिबट्याबाबत पुरावे आढळल्यास वन विभागाला तात्काळ सूचित करावे, असे सांगण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी घनदाट जंगल असून, तेथे अनेक प्रजातींचे प्राणी आहेत. जंगलाला लागून अनेक ठिकाणी नागरीकरण होत आहे. जंगल परिसरात होणाऱ्या मानवाच्या अतिक्रमणामुळे वन्यजीव खाद्य व पाण्याच्या शोधात अशा वस्त्यांमध्ये येत असल्याचे दिसून येत आहेत. एकंदरीत पालघर तालुक्याच्या किनारपट्टीच्या भागात बिबट्यामुळे नागरिकांनी सावधगिरीचा पवित्रा घेतला आहे. रात्री-अपरात्री, पहाटे एकट्याने फिरणाऱ्या नागरिकांना यामुळे काहीअंशी चाप बसला आहे. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसली तरीही सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
मोकाट जनावरे भक्ष्य
पालघर जिल्ह्याच्या पश्चिम भागांत अनेक बागायतदार आपली गुरे मोकाट सोडत असल्याचे दिसून येते. शिवाय श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी उपाययोजना नसल्याने त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. अशी मोकाट जनावरे बिबट्या व अन्य प्राण्यांसाठी भक्ष्य ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्या शोधात बिबट्या मानवी अधिवास क्षेत्रामध्ये शिरकाव करत असल्याचे दिसून येते.
जनजागृतीचा अभाव
थंडीच्या दिवसात सायंकाळी लवकर अंधार होत असून, अनेकदा दुर्गम भागात व पाड्यात राहणारे शाळकरी विद्यार्थी अंधार झाल्यानंतर एकटे घराकडे चालत जाताना दिसतात. ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याची शंका व्यक्त करण्यात येते, अशा ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी एकत्रित प्रवास करणे तसेच दक्षता घेण्याबाबत जनजागृती करण्यात वन विभाग अपयशी ठरल्याचे दिसून येते.