१५ वर्षांपासून असलेल्या रुग्णालयात वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे रुग्णांचे हाल

रमेश पाटील

वाडा :  वाडा व भिवंडी या दोन तालुक्यांच्या हद्दीवर असलेल्या अंबाडी ग्रामीण रुग्णालयाच्या अवस्थेत गेल्या १५ वर्षांपासून काहीएक बदल करण्यात आलेला नाही. आजही हे रुग्णालय एका लहानशा भाडय़ाच्या खोलीत सुरू  आहे.  या रुग्णालयात कुठलेच तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व आवश्यक असलेले कर्मचारी तसेच सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

अंबाडीसह ५० ते ६० गावांतील ग्रामस्थांसाठी अंबाडी येथे  हे ग्रामीण रुग्णालय १५ वर्षांपूवी सुरू करण्यात आले आहे.  या गावांतील लोकसंख्या सुमारे १२ हजार आहे.  आजारी व्यक्तीला गावाजवळच वेळीच उपचार मिळावे यासाठी हे रुग्णालय सुरू करण्याचा उद्देश होता. भाडेतत्वावर छोटीशी जागा घेऊन हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. परंतु रुग्णालय सुरू झाल्यापासून  रुग्णांना समाधानकारक उपचार सुविधा मिळालेल्या नाहीत.  ग्रामीण रुग्णालयात मिळणाऱ्या एक्सरे, सोनोग्राफी, नवजात अर्भकाला ठेवण्यासाठी व्यवस्था आदी ्अनेक सुविधा येथे नाहीत. तज्ज्ञ डॉक्टर, पुरेसा कर्मचारी वर्गदेखील नाही.  रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवावे लागत आहे.  या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेले कर्मचारी अन्य ग्रामीण रुग्णालयांत कार्यरत असल्याचे सांगितले जाते.

या ग्रामीण रुग्णालयाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हा शल्यचिकित्सक यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने येथील गोरगरीब रुग्णांना साध्या  आजारांवरदेखील खासगी रुग्णालयांमधून उपचार करून घ्यावे लागत आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

रुग्णालय गणेशपुरीत हलविण्याची मागणी

अंबाडी ग्रामीण रुग्णालयांबाबत अनेकदा शासनाकडे तक्रारी करूनही दखल घेतली गेलेली नाही, असे येथील ग्रामस्थ आणि  संघटनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार यांनी सांगितले.  या ग्रामीण रुग्णालयाची इमारत होईपर्यंत रुग्णालय गणेशपुरी येथे हलविण्यात यावे अशी मागणी  संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी  जिल्ह्य़ाधिकाऱ्यांसह आरोग्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.