पालघर : एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राज्यात सर्वाधिक प्रसुती सेवा पुरविल्याबद्दल डहाणू तालुक्यात सायवन प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्य विभागातर्फे प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर राज्यात सर्वाधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याबद्दल व विशेष नवजात शिशु काळजी कक्षात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पालघर जिल्ह्याला राज्यात द्वितीय पुरस्काराने सन्मानित केले. जागतिक आरोग्य दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्र आरोग्य सन्मान २०२५ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ७ एप्रिल रोजी करण्यात आले होते. आरोग्यवर्धी सुसंवाद, आशादायी भविष्य या घोषवाक्याखाली झालेल्या या कार्यक्रमात राज्यभरातील उल्लेखनीय आरोग्य सेवा पुरविणाऱ्या आरोग्य संस्थांचा गौरव करण्यात आला.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र असून सायवन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी२०२५ या कालावधीत ४३४ प्रसूती नोंदवण्यात आल्या. त्याचबरोबरने डहाणू तालुक्यातील गंजाड येथे ४२९ व जव्हार तालुक्यातील साखरशेत येथे ३३० प्रसूती सेवा पुरवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे पालघर जिल्ह्यातील शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य विभागाला एकंदर ९२९० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी जिल्ह्याने ७७४४ शस्त्रक्रिया करून ८३.३६ टक्के कामगिरी केल्याबद्दल नांदेड जिल्हा (८४ टक्के) पाठोपाठ राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. यापैकी जिल्हा आरोग्य विभागासमोर ठेवण्यात आलेल्या ७२५५ शस्त्रक्रियांपैकी ६५५५ (९०.३५ टक्के) तर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत करावयाच्या २०३५ शस्त्रक्रियांपैकी ११८९ (५८.४३ टक्के) शस्त्रक्रिया केल्याची माहिती पुढे आली आहे.
विक्रमगड तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसोबत डहाणू तालुक्यातील ऐना, आशागड, गंजाड, सायवन, जव्हार तालुक्यातील जामसर, नांदगाव, साखरशेत, मोखाडा तालुक्यातील आसे, खोडाळा, तलासरी तालुक्यातील आमगाव, सूत्रकार व पालघर तालुक्यातील मासवण प्राथमिकल आरोग्य केंद्रांमध्ये कुटुंब नियोजन उद्दिष्टचे १२५ टक्केपेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात स्थापन झालेल्या विशेष नवजात शिशू काळजी कक्ष अर्थात स्पेशल न्यू बॉर्न युनिटमध्ये दाखल केलेल्या ४१३४ नवजात शिशुपैकी ३८०३ (९२ टक्के) बालकांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. नवजात बालकांवर यशस्वी उपचार करण्यामध्ये पालघर जिल्हा हा डागा (नागपूर) जिल्ह्याच्या अशा प्रकारच्या ९५.३० कामगिरीपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असल्याने पालघर शल्यचिकित्सक विभागाला पुरस्कृत करण्यात आले.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
जिल्ह्यात होणाऱ्या प्रसूतीपैकी सुमारे ७० टक्के प्रसूती शासकीय आरोग्य संस्थांमध्ये होतात. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात पुरविल्या जाणाऱ्या सेवा गुणवत्तापूर्वक देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत डॉ. संतोष चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी