लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर : सफाळे रेल्वे स्थानकालगत असणारे फाटक सुरू करण्याच्या दृष्टीने सफाळे विकास कृती समिती व प्रवासी संघटनांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले असून सफाळे येथील रेल्वे फाटक यापुढे कायमचे बंद राहणार असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याकरिता पर्याय असणारे पादचारी पूल दोन – अडीच महिन्यात उभारून त्यावर सरकते जिने उभारण्याचे काम पश्चिम रेल्वे तातडीने हाती घेईल असे सांगण्यात आले. समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प असल्याने या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पश्चिम रेल्वेतर्फे करण्यात आले.
सफाळे येथील रेल्वे फाटक ३१ मार्च मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले होते. याअनुषंगाने ४ एप्रिल रोजी सफाळे विकास कृती समितीकडून आंदोलन छेडण्यात आले होते. या अनुषंगाने खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी आंदोलन करणाऱ्या पूर्व व पश्चिम भागातील नागरिकांची स्वतंत्रपणे बैठक घेऊन त्यांच्याकडून निवेदन स्विकारून अडचणी समजून घेतल्या होत्या. त्यानंतर ७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी तसेच रेल्वेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार सहभागी झाले होते. यावेळी सफाळे रेल्वे फटका विषयी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल असे ठरवून आज सकाळी पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत बैठक ठरविण्यात आली होती.
आज पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) पंकज सिंग यांच्या समवेत मुंबई सेंट्रल येथे झालेल्या बैठकीत सफाळे विकास कृती समिती, प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी व काही नागरिकांनी भेट घेतली असता या विषयासंदर्भात सुमारे दोन तास वेगवेगळ्या पर्यायांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र स्थानिक पातळीवर सुचवण्यात येणाऱ्या विविध पर्याय व्यवहार्य नसल्याचे सांगण्यात आल्याने तसेच रेल्वे फाटक पुन्हा खुले करणे शक्य नसल्याने चर्चा निषफळ ठरली.
समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग हा पंतप्रधान कार्यालयाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून जानेवारी महिन्यापासून तो कार्यरत करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा सुरू आहे. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे हा प्रकल्प कार्यान्वित होऊन शकला नाही असे सांगण्यात आले. हा प्रकल्प एप्रिल महिन्यात सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे रेल्वेचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
सध्या या मालवाहू मार्गावर ट्रायल रन अर्थात चाचणी घेण्याचे काम सुरू असून या मार्गाची पश्चिम रेल्वेची जोडणी आवश्यक विद्युत व सिग्नल यंत्रणामध्ये नूतनीकरणचे काम पूर्ण होऊन पुढील आठवड्यात मालवाहू मार्ग सुरू होईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर सफाळे येथे बंद करण्यात आलेले रेल्वे फाटक पुन्हा सुरू करणे शक्य नसून या पार्श्वभूमीवर सुचवण्यात आलेल्या विविध पर्यायांना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन प्रयत्नशील राहील असे आश्वासन देण्यात आले.
सफाळे करिता सुचवलेले पर्याय
सफाळ्याच्या पूर्वेला असणाऱ्या जिन्याला सरकत्या जिन्याची जोड देण्याच्या दृष्टीने जागा उपलब्ध करून दिल्यास पूर्वेच्या बाजूला सरकता जिना दोन महिन्यात उभारण्याची तयारी दर्शवण्यात आली. तसेच अस्तित्वात असलेला जिना पश्चिमेच्या बाजूला उपनगरीय रेल्वे चौपदरीकरण प्रकल्पाच्या पुढे नेऊन त्या ठिकाणी देखील जागेच्या उपलब्धतेनुसार सरकता जीना तातडीने उभारण्याचे तयारी रेल्वे प्रशासनाने दर्शवली. सफाळा रेल्वेने स्थानकात अस्तित्वात असलेल्या पादचारी पुलाच्या उत्तर व दक्षिणेला दोन नवीन पादचारी पूल उभारण्याचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
सफाळे रेल्वे फाटक पुन्हा कार्यान्वित करणे शक्य नसून पादचारी पुलाचा विस्तार, नव्याने उभारणे तसेच दोन्ही बाजूला सरकते जिने व उद्वाहक उभारण्यासाठी पश्चिम रेल्वे कडून लवकरात लवकर कामे हाती घेऊन पूर्ण करण्यात येतील. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींबद्दल रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. -डॉ. हेमंत सवरा, खासदार