पालघर : गेल्या तीन दशकांपासून पालघरचे प्रतीक सेवा मंडळ कर्णबधिर मुलांसाठी शाळा आणि वसतिगृह चालवत आहे. या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा संस्थेचा मानस असून, त्यासाठी दात्यांकडून आर्थिक पाठबळ हवे आहे.
तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील पालघर परिसरामध्ये कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय नसल्याचे लक्षात घेऊन एका कर्णबधिर कन्येच्या चिंतातूर पालकाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने १९९० मध्ये प्रतीक सेवा मंडळ स्थापन केले. संस्थेने सुरुवातीची आठ वर्षे शाळा भाडय़ाच्या जागेत चालवली. नंतर दानशुरांच्या मदतीने संस्थेने वसतिगृहासह विद्यालयाची स्वत:ची इमारत उभारली. जमनाबेन विठ्ठलभाई शापरीया कर्णबधिर विद्यालय आणि सुहासिनी रामचंद्र सावे कर्णबधिरांचे वसतिगृह असे त्याचे नामकरण करण्यात आले.
सध्या या विद्यालयात ७४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांची शिक्षण, निवास आणि भोजनाची व्यवस्था करणे संस्थेला आर्थिकदृष्टय़ा आव्हानात्मक ठरत आहे. शासनाकडून या संस्थेला विद्यार्थी संख्येनुसार अनुदान मिळत असले तरी अतिरिक्त मुलांचा खर्च संस्थेलाच उचलावा लागतो. शाळेत कर्णबधिर मुलांची संख्या वाढतच असून, त्यासाठी अतिरिक्त विशेष शिक्षकांचीही गरज भासत आहे. आता शालान्त परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण देण्याचा संस्थेचा विचार आहे. त्यासाठी संस्थेला जागा, वाढीव इमारत आणि अन्य सुविधांची आवश्यकता आहे. कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी संस्थेला आर्थिक मदत हवी आहे.