कासा : मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत तलासरी येथील सवणे सावरपाडा येथे साधारण दोन कोटी खर्चून तयार केलेला रस्ता जेमतेम महिन्याभरातच उखडला आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करूनही निकृष्ट कामाविषयी कारवाई करण्यात आलेली नाही.
पालघर जिल्ह्यात रस्त्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्तेच जेमतेम महिनाभरात उखडलेले दिसत आहेत. आदिवासी भागातील गावे, या रस्त्यांनी जोडली जावी, म्हणून तयार केलेले हे रस्ते निकृष्ट कामे आणि ठेकेदाराच्या मनमानीमुळे काहीच दिवसांत तकलादू होतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत तक्रारी करूनही ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांत प्रचंड नाराजी आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
तलासरीमधील सवणे सावरपाडा येथे जवळपास दीड ते दोन कोटी खर्चून मे महिन्यात रस्ता तयार करण्यात आला होता. हा रस्ता आता जुलैमध्येच उखडला आहे. याबाबत वडवली सवणे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुनील टोकरे यांनी मुख्यमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून तक्रार केली होती. परंतु त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या रस्त्यावरील खड्डे आणि वाईट स्थितीमुळे अनेक अपघात होत आहेत. वाहनचालक, प्रवासी जखमी होत आहेत. मग आता येथील आदिवासी बांधवांचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न माजी उपसरपंच सुनील टोकरे यांनी विचारला आहे.
सवणे सावरपाडा हा रस्ता तयार होतानाच तो निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघडकीस आले होते. रस्त्यावरील मोऱ्या बांधताना हलक्या दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. मातीमिश्रित रेती वापरण्यात आली होती. रस्त्यावर खडी ऐवजी मोठय़ा आकाराचे दगड वापरण्यात आले. मुरुमाऐवजी मातीचा वापर केला गेला. नव्याने मोऱ्या न बनवता जुन्याच मोऱ्या दुरुस्त करून नव्या बांधल्याचे भासवले गेले. कमी जाडीचा कार्पेट तयार करण्यात आला. दिलेल्या अंदाजाप्रमाणे कामे अजिबात झाली नाहीत, असे आरोप टोकरे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये केले आहेत. मुख्यमंत्री सडक योजनेचे उपअभियंता तुषार भदाणे यांना या सर्व गोष्टींची माहिती फोनवरून देण्याचा प्रयत्न केला, परंतु भदाणे यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. रस्त्याची पाहणीही केली नाही अथवा ठेकेदाराची चौकशीही केली नाही. कारवाई तर दूरच राहिली, असे टोकरे यांनी सांगितले.
सदर रस्त्याची पाहणी करून आवश्यक कारवाई करण्यात येईल. तसेच रस्ता ठेकेदाराकडून दुरुस्त करून घेतला जाईल. — तुषार भदाणे, उपअभियंता, मुख्यमंत्री सडक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा