पालघर जिल्ह्यतील १० हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

कासा :   पालघर जिल्ह्यतील   पाचवीच्या ६४५७  आणि आठवीच्या  ४०६९ विद्यार्थ्यांंनी गुरुवारी शिष्यवृत्तीची प्रत्यक्ष परीक्षा दिली.  ही परीक्षा  पालघर जिल्ह्यतील आठ तालुक्यात  इयत्ता पाचवी  करता ७४ केंद्रावर तर आठवीसाठी ५० अशा एकूण १२४ केंद्रावर  घेण्यात आली. करोनाचे नियम पाळत ही परीक्षा सुरळीपणे पार पडली.

राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांंची शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी घेण्याचे निश्चित केले होते. परंतु दरम्यानच्या काळात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.   राज्यातील आणि जिल्ह्य़ातील करोनाची स्थिती आटोक्यात येताच ८ ऑगस्टला परीक्षा घेण्यास राज्य परीक्षा परिषदेने मान्यता दिली. परंतु, राज्यातील काही जिल्ह्यंमध्ये ८ ऑगस्टला केंद्र शासनामार्फत सेंट्रल पोलीस फोर्स या पदाची लेखी परीक्षा होणार असल्याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) ९ ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित करून तालुकानिहाय परीक्षेचे तयारी पूर्ण केली होती.  या परीक्षेचे प्रवेशपत्र २७ जुलैपासून संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले होते. पण, आता ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन असल्याने या दिवशी परीक्षा घेऊ नये, अशी मागणी जोर धरू लागली होती. अशातच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीने विद्यार्थ्यांंच्या दळणवळणात अडचणी निर्माण होतील याबाबतचे निवेदन  काही संघटनांकडून  प्राप्त झाल्याचे कारण देऊन ही परीक्षा १२ ऑगस्ट रोजी घेतली जाईल, असे जाहीर केले होते.  त्यानुसार गुरुवार १२ ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यतील आठ तालुक्यात एकूण १७४ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली.