पालघर : विद्यार्थ्यांना शेतीतल्या नवनवीन प्रयोगांची माहिती व्हावी, व्यावसायिक शेती आणि शेती संबंधित व्यवसायांकडे विद्यार्थ्यांनी वळावे याकरिता सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात प्रयोगशील शेतकऱ्यांशी संवादाचे तसेच बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ऑर्किड फुलांची शेती करणारे तसेच अॅवाकोडा फळांच्या झाडांची लागवड करणारे कृषिभूषण रामचंद्र सावे आणि भोपळी मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे राजेंद्र चुरी यांना संवादासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मुलाखतकार सुहास राऊत यांनी शेतीविषयक अनेक प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या मनातील जिज्ञासा पूर्ण केली.
शास्त्राचा अभ्यास, उत्तम आकलन आणि चुकांचा सूक्ष्म अभ्यास केला की आपल्या स्वप्नात नसलेले यश देखील आपल्याला प्राप्त होते, असे प्रतिपादन रामचंद्र सावे यांनी केले. ऑर्किड फुलांचे टिशू, नारळाच्या सालांवर केलेली अधांतरी लागवड, शेडनेटमध्ये केलेले त्यांचे संगोपन, त्यांना दिले जाणारे फिल्टर पाणी, त्यांची मागणी आणि विक्री ही सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवली. हे तंत्रज्ञान पाहायला अन्य राज्यातून, देशातून अनेक शेतकरी येतात हे त्यांनी आवर्जून सांगितले. ॲवाकोडा लागवडीची विशेष माहिती सांगितली. जगभरातल्या अनेक देशांना दिलेल्या भेटींचे अनुभवदेखील त्यांनी सांगितले.
‘तुम्ही झाडांच्या सानिध्यात राहू लागला की झाड तुम्हाला मला काय हवं नको ते सगळे सांगते.’ अशा काव्यात्म विधानाने राजेंद्र चुरी यांनी संवादाला सुरुवात केली. भोपळी मिरची उत्पादनाचा प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांना उलगडून सांगितला. आम्ही मेहनतीने शेतकऱ्याची प्रतिमा बदलली. उत्तम तंत्रज्ञान आणि अभ्यासाच्या जोरावर शेतकरी सधन होऊ शकतो, हे दाखवून दिले. पालघर परिसरातील किमान दहा शेतकरी भारताचे रोल मॉडेल होऊ शकतील असे प्रतिपादन राजेंद्र चुरी यांनी केले. शेतकऱ्यांना सरकारकडून जीएसटी नंबर मिळाला पाहिजे, अशीही मागणी त्यांनी व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष सीए सचिन कोरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. उपाध्यक्ष धनेश वर्तक, सचिव सुधीर कुलकर्णी, अनिल पाटील, विश्वस्त सोहनलाल बाफना, माजी खजिनदार हितेंद्र शहा, अॅड. हेमप्रकाश तरडे, अमिता राऊत आदी मान्यवर सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपप्राचार्य प्रा. महेश देशमुख, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अस्मिता राऊत, ग्रामीण विकास प्रमुख डॉ. प्रकाश घरत, अंकुर ग्रीन क्लब प्रमुख डॉ. स्वप्निल केणी आणि हॉर्टिकल्चर विभाग प्रमुख प्रा. प्रवीणा कोचरेकर, शिक्षक प्रा. आनंद जाधव आणि कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक प्रा. विवेक कुडू यांनी विशेष मेहनत घेतली.
बियाणं महोत्सवला उस्फूर्त प्रतिसाद
देशी वाण टिकावेत म्हणून महाविद्यालयात बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात २५ स्टॉलवर अनेक पारंपरिक बियाणी ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांसाठी या निमित्ताने परसबाग स्पर्धा जाहीर करण्यात आली. या बियाणे महोत्सवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण राहिला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील उपलब्ध बियाणं विक्रीसाठी आणले होते. त्यामुळे बियाणांची तोंड ओळख, भाजीपाला उत्पादनासाठी उत्तेजन व विद्यार्थ्यांचे शेतीकडे आकर्षण करण्यास हा उपक्रम उपयुक्त ठरला.