पालघर :  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटीजवळ झालेल्या अपघातात दोन गंभीर असणाऱ्या रुग्णांना मुंबई येथे पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळय़ा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

चारोटी येथे झालेल्या अपघातात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचे निधन झाले. त्यांचे मृतदेह रात्री उशिरा जे.जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या अपघातात जखमी असणाऱ्या डॉ. अनायता पंडोले व दरीयस पंडोले यांच्यावर वापी येथे उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांना हरित मार्ग ग्रीन कॉरिडोर उपलब्ध करून देऊन त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले.

अपघातस्थळी कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी भेट दिली. त्याचबरोबर पुणे येथील क्रॅश इन्वेस्टीगेशन टीम आणि वसई येथील उपप्रादेशिक कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक मनीषा मोरे यांनी अपघातग्रस्त वाहनाची तपासणी केली. याचबरोबरीने न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) विभागाकडून अपघातग्रस्त वाहनाची व

अपघात ठिकाणाची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

या प्रकरणात परिवहन विभाग तसेच न्याय्वैद्यक विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात येईल असे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.