लोकसत्ता प्रतिनिधी
पालघर : पालघर परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक रघुनाथ माधव पाटील उर्फ कवी आरेम् (९१) यांचे आज पहाटे केळवे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विकास, विविध ही दोन मुले, स्मिता, नुतून या विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कवी आरेम् यांना घरच्या परिस्थितीमुळे पारंपरिक शेती व्यवसायाकडे लक्ष देणे भाग पडले. निसर्गरम्य केळवे गाव व परिसर, शेतीवाडीची पार्श्वभूमी असल्याने स्वप्नवेडा, कलंदरी, चित्रकला खेळ, नाट्यभिनय असे कलाप्रेमी पैलू असलेल्या कवी आरेम् यांना लिखाणाचे वेड लागले. बागायती मध्ये राहाटाचे पाणी देता देता त्यांनी लिहिलेली “मातीत मिळालं मोती” या कादंबरीचे प्रकाशन २५ जानेवारी १९७३ रोजी झाले.
अनेक ज्येष्ठ साहित्यिकांचा सहवास लाभत राहिल्याने त्यांच्या लिखाणाला प्रेरणा मिळत राहिली. त्यांचे वनव्यातल्या वेली, कथा दोघांच्या, ऋतू प्रीतीचा, नियतीचा खेळ हे कथासंग्रह, मळा, कलंदर, केळफुल, मनुका, भाव मनीचे व लक्षवेधी भाष्यकाव्य हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्याचबरोबरने फणसातले मधुर गरे, आधार वृक्ष, कृतार्थ रघुनाथ, साठवणीतील गुलमोहोर हे ललित चरित्रात्मक पुस्तके व केळव्याची शितलादेवी ही पौराणिक माहितीपर पुस्तिका प्रसिद्ध झाली आहे. यापैकी अनेक कथा व काव्यसंग्रहांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
आणखी वाचा-‘वाढवण’साठी स्वतंत्र पायाभूत सुविधा; पालघर जिल्ह्याचा आर्थिक स्तर तिपटीने वाढण्याचा दावा
केळवे गावाला एकत्र आणण्याचा विचारातून सहकारी संस्था, शिक्षण संस्था, क्रीडा संस्था निर्माण करण्याची त्यांना प्रेरणा झाली. नूतन विद्या विकास मंडळाचे आदर्श विद्यामंदिर केळवे, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी, पालघर, केळवे शेतकरी सहकारी सोसायटी, केळवे ताडी उत्पादक सहकारी सोसायटी, केळवे मीठ उत्पादक सहकारी सोसायटी लिमिटेड, केळवे पान विक्रेता संघ, श्री शितलादेवी आणि हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट केळवे, फ्रेंड्स युनियन स्पोर्ट्स क्लब कळवे अशा संस्थेच्या स्थापन व वाटचालीत आर.एम पाटील यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. केंद्र सरकारच्या मीठ सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली होती. १९६२ साली केळवे ग्रामपंचायत सदस्य तर १९७२ साली ठाणे जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून ते निवडून आले होते. साहित्य व राजकीय क्षेत्रातील अनेक दिगजांचा त्यांना सहवास लाभला होता.
आणखी वाचा-तरूणांतील व्यसनाधीनता रोखण्यासाठी श्रध्दा व संस्काराची गरज, सरसंघचालकांचे सोलापुरात सिध्देश्वर दर्शन
पालघर येथे साहित्य चळवळ सुरू करण्यास त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. जानेवारी १९९० मध्ये पालघर तालुका मराठी साहित्य मंडळाची स्थापना केली. सन १९९४ मध्ये कोकण मराठी साहित्य परिषदची शाखा पालघर येथे स्थापन करून केळवे येथे श्री. पु भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आणि पु.ल देशपांडे व शरद पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या दुसऱ्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्यध्यक्ष होते. त्यांच्या कविता व लेख लोकसत्तासह सकाळ, नवशक्ती, कोकण वैभव, चालना इत्यादी दैनिकांमधून व मासिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. नवोदित साहित्यिकांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.
त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात केळवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले व अंत्ययात्रेत सहभागी झाले.