आजी-माजी सदस्यांना पुन्हा संधी
पालघर : जिल्हा परिषदेच्या ५ ऑक्टोबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत रद्दबातल ठरलेल्या १५ सदस्यांपैकी सात सदस्यांची फेरनिवड झाली आहे. तर काही आजी-माजी सदस्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. ५७ सदस्सीय पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेची सदस्य संख्या दोनने वाढून म्हणजे १८ वरून २० झाली आहे, तर अपक्षांच्या पाठिंब्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची १३ सदस्य संख्या आहे. राष्ट्रवादीने १५ मधील दोन जागा गमावल्या आहेत.
अक्षय दवणेकर (उधवा), ज्योती पाटील (बोर्डी), सुनील माच्छी (सरावली), हबीब शेख (आसे), रोहिणी शेलार (गारगाव), अक्षता चौधरी (मांडा) व विनया पाटील (सावरा – एम्बुर) या जानेवारी २०१९ मध्ये निवडून गेलेल्या सात माजी सदस्यांनी पोटनिवडणुकीत पुन्हा विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहिलेले निलेश सांबरे यांच्या आलोंडे गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा भाजपने पराभव केला आहे. तर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांचा वणई गटामध्ये पराभव झाला आहे.
मोखाडा पंचायत समितीच्या सभापती सारिका निकम या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषद पोशेरा गटामध्ये विजयी झाल्या आहेत. याच बरोबरीने नंडोरे- देवखोप गटातून निवडून आलेल्या नीता समीर पाटील या २०१९ च्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. मोज गटातून निवडून आलेले अरुण ठाकरे यांच्या पत्नी अनुष्का ठाकरे या २०१९ त्या निवडणुकीत विजयी होऊन त्यांनी महिला बाल कल्याण विषय समितीचे सभापतीपद भूषविले होते.
पत्नीही सदस्य
जिल्हा परिषदेचे तारापूर गटातील सदस्य असलेले प्रकाश निकम यांची पत्नी सारिका निकम यांची मोखाडा तालुक्यातील पोशेरा गटातून निवड झाली आहे. पती- पत्नी हे एकाच जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कामकाज पाहण्याचा योग पालघरवायिसांना पाहायला मिळणार आहे. २००२ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक जिंकलेले प्रकाश निकम हे पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले. २००७ साली त्यांच्या पत्नी सारिका निकम या पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. २०१२ साली निकम पती-पत्नी एकत्र पंचायत समितीमध्ये सदस्य होते. जिल्हा विभाजनानंतर २०१४ मध्ये सारिका निकम पंचायत समिती तर प्रकाश निकम जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये पुन्हा सारिका निकम यांची पंचायत समिती सदस्यपदी निवड झाली तर तारापूर घाटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. पोटनिवडणुकीमध्ये सभापती पदावर असताना सारिका निकम या पोशेरा गटातून निवडून आल्या. सारिका निकम यांनी तीन वेळा मोखाडा पंचायत समितीचे सभापतिपद तर प्रकाश निकम यांनी दोनदा सभापतिपद भूषवले आहे. २००० सालापासून हे पती- पत्नी निवडणूक लढवीत असून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाश निकम यांचा पराभव झाला होता.