तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि लगतच्या परिसरात सांडपाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. औद्योगिक आणि घरगुती सांडपाण्यावर आवश्यक शुद्धीकरण प्रक्रिया न करताच ते थेट खाडी आणि समुद्रात सोडले जात असल्यामुळे मानवी आरोग्य, जलस्त्रोत, मासे, इतर जलचर, पशू – पक्षी,शेती बागायती यांना धोका निर्माण झाला आहे. सांडपाण्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाची पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड त्यांनी गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील काही उद्योगांकडून प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाण्याची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्यामुळे औद्योगिक क्षेत्र परिसरातील सरावली, खैरेपाडा, बेटेगाव, कोलवडे, कुंभवली, सालवड, पास्थळ, पाम, नवापूर, नांदगाव, आलेवाडी, मुरबे, कुंभवली या ग्रामपंचायत हद्दीमधील शेती आणि बागायती सोबतच कूपनलिका, विहिरी, तलाव सारखे पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊन पर्यावरणाचे नुकसान आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. काही उद्योग राजकीय मंडळींना हाताशी धरून उच्च सीओडी आणि टीडीएसयुक्त रासायनिक सांडपाणी रात्रीच्या सुमारास टँकरद्वारे परिसरातील निर्जन ठिकाणी विल्हेवाट लावतात. त्याचप्रमाणे कारखाना बाहेरील गटारामध्ये सांडपाण्याची गळती होऊन पहिल्या पावसाच्या पाण्यासोबत हे सांडपाणी वाहत जाऊन खाडी आणि समुद्राला जाऊन मिळते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात सरावली कोलवडे गावांच्या हद्दीत खाडीकिनारी उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या घनकचऱ्यातून निघालेले प्रदूषित पाणी खाडीवाटे पुढे समुद्राला जाऊन मिळत असल्याने मासे मृत्यूमुखी पडण्याचे प्रकार घडत असून यावर नियंत्रण ठेवण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होताना दिसते. तारापूर मधील जल प्रदूषणाविरोधात मच्छीमार संघटनानी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करून दाद मागितली होती. मच्छीमार संघटनांच्या याचिकेवर निर्णय देताना राष्ट्रीय हरित लवादाने तारापूर मधील प्रदूषणकारी उद्योग आणि सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला प्रदूषणाची भरपाई म्हणून जवळपास २०० कोटींचा दंड ठोठावला आहे. मात्र कारवाईनंतर देखील प्रदूषण नियंत्रणात येताना दिसत नाही.
औद्योगिक वसाहतीमध्ये मुख्यत्वे करून मोठे, मध्यम, व लहान प्रकारचे रासायनिक, औषध निर्मिती, कीटकनाशक निर्मिती, व कापड यांवर प्रक्रीया करणारे तसेच अभियांत्रिकी,पोलाद आणि स्टील चे जवळपास १२०० कारखाने कार्यरत आहेत. औद्योगिक परीसरात सांडपाणी निर्माण करणारे लाल व नारंगी संवर्गातील एकूण ४४४ उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या रसायनिक सांडपाण्यावर सामुदायिक सांडपाणी केंद्रात प्रक्रिया केली जाते. तारापूर येथील सीईटीपी-टीईपीएस चालवीत असलेल्या ५० दशलक्ष लिटर क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात सद्य स्थितीत फक्त २५ दशलक्ष लिटर औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर प्रक्रियाकृत सांडपाणी एमआयडीसीच्या भूमिगत वाहिनीद्वारे नवापूर जवळील समुद्रात ७.१ किलोमीटर खोलपर्यंत सोडण्यात येते. मात्र तारापूर मधील उद्योगांमध्ये २५ दशलक्ष लिटर पेक्षा अधिक सांडपाणी निर्माण होत असल्याचा अंदाज असून जास्तीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता नसल्यामुळे या सांडपाण्याची भूमिगत गटारांच्या चेंबर मधून गळती होण्याचे प्रकार घडत आहेत. सांडपाण्याची गळती रोखण्यासाठी ५० दशलक्ष लिटर क्षमतेचा सामुदायिक सांडपाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे भविष्यात रासायनिक सांडपाणी निर्मितीमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन सालवड येथील बंद असलेल्या जुन्या २५ दशलक्ष लिटर सामुदायिक सांडपाणी प्रकल्पाची दुरुस्ती करून तो देखील कार्यान्वित करण्याची गरज आहे.
घरगुती सांडपाण्याची विना प्रक्रिया विल्हेवाट:
तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. बोईसर आणि परिसरातील दहा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक नागरिक राहत आहेत. लाखोंच्या संख्येने नागरिक राहत असलेल्या इमारती आणि झोपडपट्टी परिसरातून निघणाऱ्या घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची कोणतीही यंत्रणा सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध नाही. मोठ्या गृहसंकुलांनी उभारलेले सांडपाणी प्रकल्प अनेक ठिकाणी बंद अवस्थेत असून मानवी मलमूत्रयुक्त सांडपाणी विना प्रक्रिया थेटपणे नैसर्गिक नाले, ओहोळ यांच्याद्वारे खाडीमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे जल प्रदूषणास कारणीभूत औद्योगिक सांडपाण्यासोबत घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी देखील यंत्रणा उभारण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तारापूर औद्योगिक क्षेत्रातील औद्योगिक सांडपाण्यामुळे होणारे जल प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाय योजना अमलात आणण्याचे निर्देश देऊन पुढील महिनाभरात त्याचे दृश्य परिणाम दिसले पाहिजेत अशी सक्त ताकीद दिली.
एमआयडीसी विभागाने सांडपाणी वाहून नेणारी सर्व भूमिगत गटारे आणि वाहिन्यांची तपासणी करून तात्काळ दुरुस्ती करणे, पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवून टँकरद्वारे निर्जन ठिकाणी केल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाट लावणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करणे, एमआयडीसी परिसरात पाण्याच्या टँकर वाहतुकीविरोधात जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाने जल आणि वायू प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर देखरेख ठेवणे, संशयित किंवा तक्रार आलेल्या उद्योगाविरोधात तात्काळ पाहणी करून कारवाईबाबत अंमलबजावणी करणे, ५० दशलक्ष लिटर क्षमता असलेले सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे इत्यादी उपायोजना यावेळी सुचवण्यात येऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी करीत महिनाभरात जलप्रदूषण नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले आहेत.