पालघर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर जिल्हा मुख्यालय ठिकाणी पाच-सहा फेऱ्या झाल्यानंतर गणेश नाईक यांना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव झाली. त्यांनी महामार्गाशी संबंधित सर्व घटकांना जनता दरबारमध्ये हजर राहण्याचे आदेश देत त्यांना वाहतुकीविषयी असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सज्जड दम भरला. यामुळे महामार्गावरील अनागोंदी दूर होईल अशी आशा पल्लवित झाली आहे.
मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या राज्यामधील ११२ किलोमीटर पट्ट्याचे काँक्रीटीकरण डिसेंबर २०२३ पासून सुरू करण्यात आले. या कामाला आरंभ झाल्यापासून कामाच्या दर्जाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र तत्कालीन मंत्रीगणांनी तसेच लोकप्रतिनिधींनी त्याच्यावर वक्तव्य करण्याचे टाळले होते. मात्र पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर प्रत्येक पालघर दौऱ्यादरम्यान या महामार्गाच्या सुमार दर्जाविषयी गणेश नाईक यांनी जाहीर टिपणे करून त्याची योग्य दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण व त्यामुळे होणारे अपघात हे सर्वश्रुत आहेत. मात्र महामार्गलगतची जागा एकतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिग्रहित केली आहे किंवा ती वन विभागाकडे आहे. अशावेळी राज्याचे वनमंत्री यांनीच महामार्गावरील अतिक्रमणांविषयी टिप्पणी करताना प्रत्यक्षात रस्त्यापासून नेमून दिलेल्या अंतरापर्यंत कोणत्याही प्रकारची वाहने उभी करण्यात येऊ नयेत असे फर्मान काढले. महामार्गावरील हॉटेलचालकांनी, टायर उद्योग करणाऱ्यांनी आपले नामफलक ठळकपणे लावावे, तसेच पोलिसांनी नेमून दिलेल्या रेषेच्या पलीकडे वाहनांची पार्किंग करू नये असे सूचित केले.
महामार्गावरील शासकीय शर्तीच्या जमिनी अथवा वनविभागाच्या जमिनीवर भराव टाकून वेगवेगळी आस्थापने उभी आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गालगत असणारे नैसर्गिक नाले बंद झाले असून त्यामुळे महामार्गावर पाणी तुंबण्याचे प्रकार घडून पावसाळ्यात वाहतुकीस अडथळा होत असतो. असे प्रकार वसई तालुक्यात अधिक प्रमाणात असल्याचे लक्षात आल्यानंतर वसई-विरार महानगरपालिका, महसूल विभाग व पोलिसांनी पाण्याच्या निचरा होण्याचे मार्ग खुले करण्यासाठी आदेशित केले. महामार्गावरील हॉटेलचालकांकडून अन्नपदार्थांचा घनकचरा लगतच्या भागात टाकल्याने दुर्गंधी पसरते हेदेखील बारकाईने लक्षात ठेवून त्यावर उपाययोजना सुचविल्या.
अन्य राज्यांत व राज्यातील इतर महामार्गांवर अवजड वाहतूक रस्त्याच्या कडेने चालवण्याच्या नियमाकडे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बगल दिली जात असून त्यावर नियंत्रण ठेवण्यास महामार्ग पोलीस व जिल्हा पोलीस अपयशी ठरल्याचे पालकमंत्री यांच्या लक्षात आले. त्यामुळे लहान वाहनांना डाव्या बाजूने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करावे लागते हे निरीक्षणदेखील मंत्री महोदयांनी नोंदवले. तसेच त्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी आवश्यक असणारे सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे पालघर पोलिसांना सांगितले.
महामार्गावर सुसज्ज रुग्णवाहिका असावी, स्वच्छतागृहे स्वच्छ राखली जावीत, तसेच रस्त्याच्या दुभाजकांच्या जागेवर लावलेल्या झाडांमध्ये ताजेपणा असावा यासाठीदेखील पालकमंत्र्यांच्या सूचना सर्वसामान्यांच्या हिताच्या ठरणार आहेत. एकंदरीत सामान्य नागरिकाला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या व दुर्लक्षित राहिलेल्या समस्यांवर पालकमंत्री यांनी जाहीर वक्तव्य करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पालकमंत्री यांनी सूचित केलेल्या उपाययोजना किती प्रभावीपणे अमलात आणल्या जातील व त्यांना अमल करण्यासाठी किती अवधी लागेल हे सांगणं कठीण असले तरीही या विषयांवर कुणीतरी वाचा फोडली ही बाब समाधानाची ठरत आहे.
….तर टोलमुक्त प्रवास
राष्ट्रीय महामार्गाची सफाई करण्याची जबाबदारी टोल वसूल करणाऱ्या ठेकेदाराची आहे. या ठेकेदाराकडून साफसफाई नियमित काम होत नसल्याचे निदर्शनास आले तर त्या दिवशी सर्व वाहनांना टोलमुक्त प्रवास करण्याचे आदेश आपण जारी करू, अशी घोषणा पालकमंत्री यांनी केली.