निखिल मेस्त्री
पालघर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्र मागील आठ वर्षे दुर्लक्षित राहिले होते. मात्र, अलीकडच्या काळात खेळ व खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन मिळाल्याने विविध क्रीडा प्रकारांत पालघर जिल्ह्याचे नाव राज्य व देशपातळीवर झळकवणारे तरुण उदयोन्मुख खेळाडू तयार झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला खऱ्या अर्थाने नव्याने उभारी मिळत आहे.
पालघर जिल्ह्याचा क्रीडा विभाग मागील सहा-सात वर्षांत विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. जिल्हा क्रीडा परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा कार्यालय यांनी हा डाग पुसून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जिल्ह्यासाठी क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका असलेल्या पालघर जिल्हा क्रीडा संकुलाचे शाश्वत विकासाकडे पडलेले पाऊल हे त्यातील एक उत्तम उदाहरण आहे.
कचरा व गवताने भरलेल्या जमिनीवर सध्या साधी खेळाची मैदाने तयार केली आहेत. या मैदानांवर शालेय क्रीडा स्पर्धासह विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. याच ठिकाणी १६ एकर परिसरामध्ये अद्ययावत व आधुनिक पद्धतीच्या संकुल विकासाला मान्यता मिळाली असून, आराखडा तयार करण्यासाठी वास्तुविशारद निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर संकुलाचा विकास होणार आहे. त्यावर जागतिक दर्जाची मान्यता असलेली धावण्यासाठी धावपट्टी व इतर खेळांसाठी आधुनिक खेळपट्टी तयार केली जाणार आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीही क्रीडा क्षेत्राकडे सकारात्मकतेने लक्ष दिल्यामुळे या संकुलाचा विकास शक्य होणार आहे.
क्रीडा संकुलावर ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून विदेशी तंत्रज्ञानाची बॉक्सिंग रिंग अलीकडील काळात कार्यरत झाली असून, या रिंगवर राज्यस्तरीय स्पर्धेचे यजमानपद पालघर जिल्ह्याला काही दिवसांपूर्वी मिळाले. त्यातून इशरत अन्सारी या मुष्टियोद्धय़ाने जिल्ह्याला सुवर्णपदक मिळवून दिले. हँडबॉल स्पर्धेचे आयोजनही जिल्ह्याने यशस्वीरीत्या केले.
आदिवासी खेळाडूंमधील खेळाडू वृत्ती व त्यांच्यामधील खेळासंदर्भातील उपजत गुण ओळखून क्रीडा विभागाने आदिवासी विकास प्रकल्प डहाणू व जव्हारअंतर्गत ३४ हजार विद्यार्थाची गुणवत्ता शोध (टॅलेंट हंट) स्पर्धा घेऊन त्यातील निवडक खेळाडू तयार करण्याचा मानस समोर ठेवला आहे. इतकेच नव्हे तर या खेळाडूंसाठी प्रकल्पस्तरावर क्रीडा निवासी प्रशिक्षण शाळा उभारण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. त्यामुळे भविष्यात या प्रकल्पांमधून विविध क्रीडा प्रकारांमध्ये आदिवासी विद्यार्थी चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास क्रीडा परिषदेला आहे.
जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत खेळाडूंना प्रोत्साहन मिळाल्यामुळे ‘खेलो इंडिया’मध्ये जिल्ह्यातील सना घोन्सालविस, इशा जाधव, तर महाराष्ट्र ऑलिम्पिक गेम्समध्ये नेहा म्हात्रे, कासीम अन्सारी या उदयोन्मुख खेळाडूंनी पदके राज्य व देशपातळीवर प्राप्त केली आहेत. तर, अलीकडेच राज्यस्तरीय सामूहिक रिले प्रकारामध्ये पालघरच्या संघाला सुवर्ण यश मिळाले आहे. कबड्डीमध्येही जिल्ह्याने अव्वल कामगिरी केली असून, १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने राज्यात अजिंक्यपद पटकाविले. या खेळाडूंना तसेच खेळाडूंच्या समूहांना क्रीडा परिषदेसोबतच क्रीडा शिक्षक-प्रशिक्षक आदींचे मार्गदर्शन तितकेच मोलाचे आहे.
जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुलाचा विकास झाल्यास पुढील काळात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल व इतर क्रीडा प्रकारांच्या राष्ट्रीयस्तरीय स्पर्धाचे आयोजन पालघर जिल्हा करू शकतो, असा विश्वास व्यक्त होत आहे. तर, जिल्ह्यामध्ये सध्या क्रीडा क्षेत्रात झालेल्या विशेष बदलामुळे राज्य, देशपातळीवर पदके प्राप्त केलेल्या खेळाडूंना अधिक मार्गदर्शन व सहकार्य लाभल्यास हे खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करतील, अशी आशा आहे.
भरीव निधीची गरज
जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन खेळाडू घडविण्यासाठी जिल्हा क्रीडा परिषदेच्या माध्यमातून अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी जिल्हास्तरावर क्रीडा शिक्षक-प्रशिक्षकांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केलेला पालघर हा बहुधा पहिलाच जिल्हा असावा. या क्षेत्राच्या सकारात्मक दृष्टिकोनासाठी घेतलेले निर्णय क्रीडा क्षेत्रासह खेळाडूंना उभारी देत आहे. उदयोन्मुख खेळाडू घडवण्याची ही सुरुवात असली तरी भविष्यात क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देण्यासाठी भरीव निधीची खरी गरज आहे.