नीरज राऊत
पालघर तालुक्यातील माहीम येथील समुद्र किनाऱ्याजवळ निर्जन ठिकाणी गेल्या आठवडय़ाअखेरीस सामूहिक बलात्काराची घटना घडल्याचे उघडकीस आले. फेसबुक प्रकरणानंतर पालघर चर्चेत राहिल्यानंतर १० वर्षांनी पालघर भागाला पुन्हा कुप्रसिद्धीला सामोरे जावे लागले.
कामानिमित्त सायंकाळी बाहेर पडलेल्या १५ वर्षीय तरुणीला तिच्या मित्रांनी हेरले व नंतर त्या (शुक्रवार) रात्रीपासून दुसऱ्या दिवशी दुपापर्यंत नऊ तरुणांनी तिच्याशी आलटून-पालटून शारीरिक अत्याचार केल्याचे सातपाटी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत उल्लेखित आहे. या प्रकरणी पोलिसांनी २० ते ३० वयोगटातील नऊ तरुणांना अटक केली असून पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत. शासकीय व्यवस्था या नराधमांविरुद्ध कायदेशीर कठोर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करेल यात काही शंका नाही.
अलीकडच्या काळात या भागात अशा प्रकारची घटना प्रथमच घडल्याने या वृत्ताचे पडसाद दूरवर उमटले. पालघरशी संबंधित अनेक नागरिकांनी येथील नातेवाईक, मित्रपरिवाराला भ्रमणध्वनीवरून घटनेमागील सत्यता, पार्श्वभूमी व सद्य:स्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तात्पर्य असे की अनेक वर्षे महिला वर्गासाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागाला असुरक्षिततेचे गालबोट लागले.
पालघर हा गेल्या काही वर्षांपासून पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला येऊ पाहत आहे. येथील समुद्रकिनारे तसेच मुंबई, ठाणेजवळ असणारी पर्यटन स्थळे शहरी भागातील नागरिकांना खुणावतात. गेल्या काही वर्षांत पर्यटन व्यवसायामध्ये वृद्धी झाल्याने त्यावर आधारित अनेक जोडधंद्यांना चालना मिळाली असून, करोना टाळेबंदीच्या काळातील आर्थिक संकटातून पर्यटन व्यावसायिक सावरत असताना सामूहिक बलात्कार घटनेने या व्यवसायाला जणू झटका दिला आहे.
या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हे कृत्य करणारी मंडळी पर्यटनानिमित्त आलेली बाहेरगावची तरुण मंडळी नव्हती तर स्थानिक तरुणांनी केलेला हा प्रकार होता. त्यामुळे येथील तरुणांमधील अपप्रवृत्ती पुढे आली आहे. प्रथम या घटनाक्रमात अमली पदार्थाचा वापर झाल्याचे पोलिसांनी उल्लेखित केले होते. कालांतराने त्यांनी तपासणीमध्ये अमली पदार्थ सापडले नसल्याचा खुलासा केला. पोलिसांनी वर्तविलेल्या या प्राथमिक अंदाजामुळे पालघर जिल्ह्यात अमली पदार्थाचा सर्रास वापर होतो याच्यावर जणू शिक्कामोर्तब झाले आहे. त्यापलीकडे जाऊन तरुण व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याचे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमधील आरोपांची जणू पोलिसांनी माहीम सामूहिक बलात्कार प्रकरणात पुष्टी केली आहे. अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी अनेक उपाययोजना आखण्यात आल्या असल्या तरी स्थानिक पोलिसांच्या सहभागाशिवाय अमली पदार्थाची तसेच गुटखा तस्करी शक्य नाही हेदेखील तितकेच उघड आहे.
या घटनेला जबाबदार ठरवणारी अनेक कारणे सांगितली जात असून पाश्चात्त्य विचारांचा तसेच टीव्ही मालिकांचा बालमनावर तरुणाईवर झालेला परिणाम, आई-वडिलांशी पाल्यांचा कमी झालेला संवाद, तरुणांवर समवयीन मित्रपरिवाराचा असलेला प्रभाव (पगडा) तसेच मद्य सेवन किंवा इतर गैरप्रकार करण्यासाठी ग्रुप किंवा समूहाचा राजरोजपणे होणारा वापर या घटनेला तितकाच जबाबदार आहे. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात शालेय विद्यार्थी शाळा, क्लास बुडवून एकत्र फिरायला जाणे, पार्टी करणे, अर्ध दिवसीय सहलीला जाण्याचे प्रकार घडताना दिसतात. त्यावर अंकुश राहत नसल्याने पुढे मोठय़ा प्रकारांमध्ये परिवर्तन होताना दिसते.
गेल्या काही वर्षांपूर्वी पर्यटन व्यवसाय वाढीला आला असताना त्यामुळेदेखील अपप्रवृत्तीला चालना देणाऱ्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. निखळ पर्यटन, कौटुंबिक पर्यटन अशी या भागातील किनाऱ्यांची ओळख कमी होऊन कपल टुरिझम अर्थात जोडप्यांसाठीचे ठिकाण अशी नवीन ओळख होऊ लागली आहे. गावात सुरू झालेल्या अनैतिक प्रथांविरुद्ध काही ठिकाणी स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर असे प्रकार नियंत्रणात आले होते, तरीदेखील शनिवार, रविवारव्यतिरिक्त पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत तोंडाला दुपट्टा, स्कार्फ बांधून जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अल्पावधीसाठी येणाऱ्या जोडप्यांवर नियंत्रण कोणी ठेवायचे हा प्रश्न अनुत्तरित राहत आहे. या सर्व प्रकारांबाबत स्थानिकांमधून उठाव होणे आवश्यक झाले आहे.
चौकीसमोरून प्रवास
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या यंत्रणेचा वापर गुन्हा घडल्यानंतर तपासकार्यात होताना दिसतो. या चित्रीकरणाचा वापर पुढील गस्ती नाक्यांवर चौकशीकामी वर्दी देण्यासाठी झाला तर लाभदायी ठरू शकेल. तसेच जिल्ह्यात असणाऱ्या विविध ठिकाणी असणाऱ्या न्याहरी निवास केंद्रात वा हॉटेल, रिसॉर्टमध्ये येणाऱ्या मंडळींची योग्य नोंद होते किंवा नाही यावर देखरेख ठेवणे गरजेचे झाले आहे. या संपूर्ण किनारपट्टीलागत अनेक निर्जन ठिकाण असून अशा ठिकाणी पोलिसांकडून सायंकाळनंतर गस्त ठेवणे तसेच आवश्यकता भासल्यास कारवाई करणेदेखील गरजेचे आहे. मात्र अशा बाबींकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे या दुर्दैवी घटनेतील पीडित तरुणी प्रत्यक्षात अत्याचार होण्यापूर्वी किमान दोनदा पोलीस चौकीच्या समोरून प्रवास केल्याचे तक्रारीतून स्पष्ट झाले आहे. जर त्या चौकीवर पोलीस यंत्रणा सतर्क असती तर कदाचित हा दुर्दैवी प्रकार घडला नसता. जिल्ह्यात अमली पदार्थाचा सर्रास होणारा वापर व अनेक ठिकाणी उघडय़ावर विनापरवाना मद्यपान करण्याचे प्रकार घडत असून त्यावर रोख ठेवण्यास पोलिसांना स्वारस्य नसल्याचे दिसून आले आहे. एकंदरीत या दुर्दैवी घटनेमुळे पालघर जिल्ह्याच्या एकंदर छबीवर परिणाम झाला आहे. त्याबाबत पर्यटन व्यावसायिक व पोलिसांनी तातडीने आवश्यक बदल अमलात आणले नाही त्याचे दीर्घकालीन परिणाम उमटतील यात शंका नाही. वर्षांअखेरीसाठी अनेक पर्यटक येथील समुद्रकिनारी व विविध पर्यटनस्थळी येत असताना अशा मंडळींची सुरक्षितता व या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ठोस उपाययोजना आखणे गरजेचे झाले आहे. या घटनेला या तरुणांचा समाजमाध्यमाचा होणारा बेसुमार वापर, समाजव्यवस्था व त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात अपयशी ठरलेले पालक, पोलीस व इतर व्यवस्था तितक्याच प्रमाणात जबाबदार असून या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.