बोईसर : बोईसर आणि परिसरातील अनेक बारमध्ये रात्रीच्या वेळी बार, लॉजिंग-बोर्डिगच्या ठिकाणी मोठय़ा प्रमणात देहविक्रय आणि अनैतिक धंदे चालू आहेत.
बोईसर आणि तारापूर औद्योगिक वसाहत परिसरातील सत्तर बंगला व शेजारील परिसरात काही बार रेस्टॉरंट, व हॉटेलस या ठिकाणी रात्री १० वाजेपासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत डान्स बारमध्ये नृत्याचे कार्यक्रम सुरू आहेत. यात बोईसर रेल्वे स्थानक परिसर आणि औद्योगिक वसाहतीतील काही बारमध्ये हे अनैतिक धंदे सुरू असून नृत्य करणाऱ्या मुलींवर रात्रभर पैशांची उधळण सुरू असते.
त्याच प्रमाणे बोईसर रेल्वे स्थानक रस्ता आणि नवापूर नाका परिसरातील लॉजिंग आणि बोर्डिग मध्ये खुलेआम देहविक्रय सुरू आहे. यात शाळा आणि कॉलेजमधील मुला-मुलींना देखील काही तासांकरीता सहजरित्या प्रवेश दिला जातो. या सर्व अनैतिक धंद्यांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परवानगी नसताना बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली नर्तिका फिल्मी गाण्यांवर अश्लील हावभाव करून नृत्य करण्यात येत असून रात्री २ ते ३ वाजेपर्यंत प्रकार सुरू असतो.
बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहती मध्ये अवैध डान्सबार आणि लॉजिंग बोर्डिग सोबतच शहरातील हायफाय ब्युटी पार्लर आणि सलोन च्या नावाखाली देखील मोठय़ा प्रमाणात देहव्यापार सुरू असून यामध्ये मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू मुली आणि महिलांचा देखील समावेश दिसून येत आहेत. त्यामुळे बोईसर शहर आणि औद्योगिक परिसरात मोठय़ा प्रमाणात अनैतिक धंदे फोफावत असून या विरोधात पोलिसांनी धडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बोईसर मध्ये सुरू असलेल्या अवैध रित्या लेडीज बार सोबतच मोठय़ा प्रमाणात ड्रग्स, गांजा, बटण, या घातक नशेली पदार्थची विक्री खुले खुलेआमपणे अवधनगर, धोडीपूजा, दांडी पाडा, आझाद नगर, रेल्वेचा धक्का या बोईसर परिसरातील भागात विक्री होत असल्याने युवा वर्गासह नव्या पिढीलाही गिळंकृत करणाऱ्या नशेच्या व लेडीज बारच्या माफिया वर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नृत्याला परवानगी नाही
बोईसर पोलीस स्थानकात संपर्क साधला असता त्यांनी ऑर्केस्ट्रा बारमध्ये नृत्याची परवानगी दिलेली नसून असे कुठे बार सुरू असतील तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.
पालघर जिल्ह्यामध्ये कोणत्याही लेडीज बार ला परवानगी दिलेली नाही जर कुठे लेडीज बार सुरू असतील तर त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
– बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर