पुरातन वास्तू भग्नावस्थेत, जागोजागी चिरे ढासळण्याच्या स्थितीत

डहाणू: डहाणू समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला ३०० वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी बांधलेल्या ऐतिहासिक डहाणू किल्ल्याला वड-पिंपळाच्या फांद्या तसेच झाडी-झुडपांनी वेढा दिल्याने किल्ल्याचे वैभव संकटात सापडले आहे. शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याने पुरातन वास्तूला जागोजागी भग्नावस्था आली, चिरे ढासळण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे डहाणू किल्ला समस्यांच्या गर्तेत सापडला आहे.

डहाणूची ऐतिहासिक ओळख सांगणाऱ्या डहाणू किल्ल्याच्या दर्शनी भागात दुरवस्था झालेल्या तोफांचे दर्शन घडते. ढासळलेले बुरूज, किल्ल्यात घुसलेल्या वड-पिंपळाच्या फांद्या यामुळे हा पुरातन ढाचा कोसळण्याच्या स्थितीत आहे. या किल्ल्यातून डहाणू तहसील कार्यालयाचे कामकाज चालते. डहाणूचे पोलीस कारागृह, पुरवठा कार्यालय, तलाठी कार्यालय, रजिस्ट्रार कार्यालय, कस्टम कार्यालयांनी या किल्लय़ाच्या आश्रयाने आपली बिऱ्हाडे मांडलेली आहेत. मात्र शासकीय विभागाच्या उदासीन कारभारामुळे किल्ल्याची पडझड अविरत सुरू आहे. किल्ल्यावरील शासकीय कार्यालये स्थलांतरित करून किल्ल्याचे वैभव त्याला पुन्हा परत मिळवून देण्याची इतिहासप्रेमी नागरिक करीत आहे.

डहाणूत महसूल कार्यालयाच्या जागेचे भूमिपूजनही करण्यात आले आहे, तसेच डहाणूत मोठय़ा प्रमाणात सरकारी जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे तहसील आणि इतर शासकीय कार्यालयांनी आपले बिऱ्हाड हलवून किल्ला पर्यटनासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. देखभाल दुरुस्तीअभावी किल्लय़ाचे बुरूज ढासळत असून वडा-पिंपळाच्या फांद्या किल्लय़ात घुसल्याने किल्लय़ाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

काळ्या पाषाणातील दगडांच्या चिऱ्यांवर उभा राहिलेला हा किल्ला उत्कृष्ट बांधकामाचा नमुना आहे. डहाणूच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या पुरातन ऐतिहासिक किल्लय़ाकडे पुरातत्त्व विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी या किल्लय़ाचा एक-एक चिरा ढासळू लागलेला आहे.

ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारे राज्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच किल्ले उरले असून डहाणूचा किल्ला त्यापैकीच एक आहे. त्यामुळे किल्लय़ाचे अस्तित्व राखण्यासाठी शासकीय यंत्रणांसह सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन ठोस उपाययोजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.