कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यातील आमगाव फाटय़ाजवळ खड्डय़ांमुळे अवघ्या २४ तासांत एकाच ठिकाणी दोन वेगवेगळय़ा अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तलासरी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आमगाव येथील उड्डाणपुलावर सोमवारी रात्री मोटार आणि टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला होता. तर, मंगळवारी दुपारी अन्य एक मोटार आणि टेम्पोमध्ये पुन्हा त्याच ठिकाणी भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आणि एक गंभीर जखमी झाला. 

या प्रकरणी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग देखरेख, दुरुस्ती करणारी कंत्राटदार कंपनी आर. के. जैन इन्फ्रा प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापक राम राठोड आणि संबंधित अधिकाऱ्यांवर बुधवारी तलासरी पोलीस ठाण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला.

पोलिसांची सावध भूमिका..

प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली

होती. मात्र, याबाबत पोलिसांनी सावध भूमिका घेतली आहे. पोलिसांकडून महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात तातडीच्या उपाययोजनांची सूची देण्यात येणार असून यासाठी काही कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीनंतर योग्य पद्धतीने दुरुस्ती न झाल्यास संबंधित अधिकारी किंवा कंत्राटदारांविरोधात गुन्हा दाखल करू, असे पालघर पोलिसांनी सांगितले.

Story img Loader