वाडा:  वाडा-भिवंडी महामार्गाच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी, आंदोलने करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या येथील श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (१० ऑगस्ट) येथील बांधकाम उपविभागाच्या कार्यालयाला घेराव आंदोलन केले. या आंदोलनाची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला चपलांचा हार लावून संताप व्यक्त केला.

गेल्या चार वर्षांपासून वाडा-भिवंडी या राज्य महामार्गाची दुरवस्था झाली आहे. येथील खासदार, आमदार, पक्षीय पुढारी या गंभीर समस्येवर बोलायला तयार नाहीत. अधिकारी दखल घेत नाहीत. आंदोलने झाल्यानंतर या रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांवर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र या रस्त्याची समस्या कायमस्वरूपी सोडवली जात नाही. यामुळे येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या महामार्गावर पडलेल्या दीड ते दोन फूट खोलीपर्यंतच्या खड्डय़ांमुळे दररोज अपघात होत आहेत. खड्डय़ांमध्ये वाहने आदळुन वाहनांचे नुकसान होत आहे. या महामार्गावर गेल्या दहा वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये शंभरहून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर दोनशेहून अधिक प्रवाशांना अपंगत्व आले आहे. असे असतानाही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

वाडा- भिवंडी या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत ११ कोटी रुपये खर्च केले असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे. कोटय़वधी रुपये खर्च करूनही या मार्गावर दोन- दोन फुटाचे खोल तर लांबच लांब खड्डे पडले आहेत. या महामार्गावर रोजच लहान मोठी वाहने अडकून बंद पडणे, त्यांचे अपघात होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वाहनांचे नुकसानही मोठय़ा प्रमाणात होत आहे.