स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाचे कोटय़ावधी रुपये पाण्यात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रमेश पाटील

वाडा : ग्रामीण भागातील रस्त्यांवर प्रकाशाची सोय होऊन विजेचीही बचत व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वाची योजना आखली होती. या योजनेअंतर्गत गावखेडय़ांत सौरदिवे लावण्यात आले. मात्र काही कालावधीतच स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे सौरऊर्जेचे दिवे बंद पडले, आता फक्त शोभेच्या वस्तू म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे. या योजनेसाठी शासनाने खर्च केलेले करोडो रुपये पाण्यात गेले आहेत. शासनाच्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अंतर्गत पालघर जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायतींना या योजनेतून सौरदिव्यांचा लाभ देण्यात आला होता. सन २०११-१२ मध्ये अमलात आणलेली ही योजना सन २०१६-१७ पर्यंत राबविण्याचे काम सुरू होते.

जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, शेष फंड तसेच ग्रामपंचायत यांच्या खर्चातून पालघर जिल्ह्यातील विविध गावखेडय़ांतील सार्वजनिक जागा, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, गावातील चौकात असे जिल्हाभरात २० हजारांहून अधिक सौरदिवे लावण्यात आले होते. मात्र स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांचे दुर्लक्षामुळे या सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीस जाणे, खांब तुटून पडणे, सौर प्लेट खराब होणे अशा अनेक कारणांमुळे आजमितीस ८० टक्के  सौरदिवे गेल्या तीन ते चार वर्षांपासून बंद पडले आहेत.

लहानात लहान असलेल्या एका सौरदिव्याच्या संचासाठी २० हजार ५०० रुपये खर्च येतो. तर चार दिव्यांच्या मोठय़ा संचासाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो.  काही सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीस गेलेल्या आहेत, तर काही नादुरुस्त झाल्या आहेत. अनेक खांब गंजून गेले आहेत, अनेक ठिकाणी सौरदिव्यांनी माना टाकल्या आहेत. सौरवीज निर्माण करणाऱ्या काचेच्या प्लेट (उपकरण) तुटून पडलेले दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी फक्त रिकामे खांब उरले आहेत.

सरकारचा उद्देश फोल ठरला

विजेची बचत व्हावी म्हणून शासनाकडून काही कोटी रुपये खर्च करून ग्रामीण भागात  सौरऊर्जेच्या माध्यमातून गावातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक ग्रामस्थांनी या शासनाच्या स्तुत्य अशा उपक्रमाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने या योजनेसाठी शासनाने खर्च केलेले करोडो रुपये पाण्यात गेले आहेत.

सौर दिवे लावल्यानंतर त्यांच्या नियोजनाची जबाबदारी ग्रामपंचायतीची होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

– रामचंद्र पष्टे, ग्रामस्थ, निचोळे, ता.वाडा.

बंद पडलेल्या सौरदिव्यांचे तातडीने सर्वेक्षण करण्यात येईल. ते दुरुस्ती करून घेण्याचे ग्रामसेवकांना लवकरच आदेश दिले जातील.

– राजेंद्रकुमार खताळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती वाडा, जि. पालघर.