लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : गुढीपाडवा व नववर्षाचे औचित्य साधून गुढीपाडवा शोभायात्रा मंडळ आणि संस्कार भारती पालघर यांच्यावतीने “सूर पहाटेचे” व गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन समितीतर्फे करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

पालघरमध्ये गेल्या २५ वर्षांपासून नववर्षाचे स्वागत निमित्त संगीताचा विशेष कार्यक्रम तसेच २०१० सालापासून त्या निमित्ताने शोभायात्रांचे आयोजन केले जात आहे. गुढीपाडवा व नववर्षानिमित्त सूर पहाटेचा कार्यक्रम सकाळी ६ ते ७.३० या वेळेत पालघर येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या आवारात संपन्न झाला. या संगीताच्या कार्यक्रमानंतर सकाळी ७.३० वाजता लक्ष्मीनारायण मंदिरापासून पालघर रेल्वे स्थानकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.

या शोभायात्रेत बॅण्ड पथक, लेझिम पथक, तारपा नृत्याचे पथक, भजनमंडळीची पथके सहभागी झाले होते. त्याचबरोबरीने नागरिकांनी आपापल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या संख्येत उपस्थित होते. पालघरमधील गणेश मंडळ, सामाजिक शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था, जाती संस्था अशा संस्थां बॅनरसह शोभायात्रेत उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. पालघर सह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुढीपाडवा निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

रमजान साठी बाजारपेठ सजली; खरेदीचा उत्साह शिगेला

जव्हार शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागात मुस्लिम बांधव वास्तव्य करून आहेत पवित्र रमजान ईदला अल्पावधी असल्याने शहरात रमजानसाठी शेवया, कपडे सुकामेवासह विविध वस्तूंनी बाजारपेठे सजली असून महिलांचा खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. रमजान निमित्ताने उत्साहाचे वातावरण असून बाजारपेठही सजली असून मार्केटमध्ये गर्दी बघायला मिळात आहे. दरम्यान बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर उपलब्ध असून सुरम्याची मोठी मागणी आहे. लहान मुलांच्या खरेदीला जास्त प्राधान्य दिले जात असून त्यामध्ये लहान मुलांचे जुनोज, चुस्ती, फुगे तर मुली व महिलांसाठी चुडीदार, खुशी तर रमजान महिन्यात हमखास वापरला जाणारा बुरखा या कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.

या वस्तूला मागणी..

अत्तर, टोपी, सुरमा, रुमाल, इतर लागणाऱ्या विविध साहित्याची मागणी वाढली आहे. निरनिराळ्या प्रकारचा सुरमा, अत्तर, कपडे, दागिने, चपला तसेच चादरी, स्कार्फ खरेदीसाठी मोठी गर्दी बाजारात होत आहे. ईद निमित्ताने महिलांमध्ये मेंदी काढण्याची परंपरा आहे. त्यामुळे बाजारात मेंदीच्या कोनाचीही मागणी वाढली आहे.

पूर्वसंध्येला बाजार फुलले…

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला तसेच रमजानच्या निमित्ताने शहरी भागातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी उफळून आली होती. त्यामुळे सामाजिक ऐक्याचे वातावरण दिसून येत होते.

चोख पोलीस बंदोबस्त…

राज्यात घडलेल्या अलीकडच्या काही घटनांच्या अनुषंगाने पालघर येथील शोभायात्रेच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून विविध नात्यांवर दुचाकी स्वरांची तपासणी देखील होत होती.